हिमालयासारखी अथांग पर्वतराजी आपल्या देशाला लाभली आहे. तेथे अनेक ठिकाणी पर्यटन स्थळे विकसित झाली असून केवळ भारतीय नव्हे तर देशोदेशीचे पर्यटक तेथे येऊन बर्फावरील स्कीईंग व अन्य खेळांचा आनंद घेत असतात. सव्वाशे कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या व भलामोठा हिमालय आपल्याकडे असूनही हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये आपल्या देशाचा एखादाच खेळाडू भाग घेत असतो. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्या देशात हिवाळी ऑलिम्पिक पदक मिळविण्याची क्षमता असलेले खेळाडू घडू शकतात याची जाणीवच अद्याप झालेली नाही. जाणीवच नसल्यामुळे असलेले नैपुण्यही सदोदित दुर्लक्षितच राहिले आहे.

दक्षिण कोरियात सध्या हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी झालेला शिवा केशवनने या स्पर्धेनंतर स्पर्धात्मक हिवाळी क्रीडा प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. १९९८ पासून हिवाळी ऑलिम्पिकबाबत एकांडी शिलेदार मानल्या गेलेल्या केशवनने निवृत्त होताना व्यक्त केलेले विचार खूपच बोलके आहेत. हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा प्रकार हे भारतीयांसाठी कारकीर्द होऊ शकत नाही. प्रत्येक खेळाडूला उपजीविकेसाठी वेगळा पर्याय निवडावा लागतो, असे त्याने मत मांडले. त्याच्या या विधानाचा क्रीडा संघटकांनी विशेषत: भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सखोल विचार केला पाहिजे. ज्या वेळी कोणताही भारतीय खेळाडू हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतो, त्या वेळी अन्य देशांच्या संघटकांकडून त्याची अवहेलनाच केली जात असते. शंभर कोटींचा देश व हिमालय लाभलेल्या भारताचा एकच खेळाडू, असे या खेळाडूकडे पाहून उपहासात्मक सांगितले जात असते.

हिवाळी ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेले अनेक क्रीडा प्रकार हिमालयातील अनेक पर्यटन स्थळांमध्ये आयोजित केले जात असतात. मात्र बहुतांशी वेळा हे क्रीडा प्रकार केवळ पर्यटकांच्या हौसेखातर घेतले जात असतात. या खेळांकडे ऑलिम्पिकच्या दृष्टीने गांभीर्याने कधीच विचार झालेला नाही. या पर्यटनस्थळी खेळांचे मार्गदर्शक म्हणून काम करणारे अनेक जण पर्यटनाचा मोसम संपल्यानंतर विविध गिर्यारोहण मोहिमांकरिता शेर्पा, प्रशिक्षक, समन्वयक आदी जबाबदाऱ्या सांभाळत असतात. कारण त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांना अन्य कोणताच पर्याय उपलब्ध नसतो. हे लक्षात घेतले तर हिवाळी क्रीडांसाठी आवश्यक असणारी अव्वल दर्जाची साधने घेणे हे त्यांच्या आर्थिक क्षमतेबाहेरचे असते. एरवी अन्य खेळांकरिता शासनाकडून भरघोस पैसा ओतला जातो. मात्र हिवाळी क्रीडांसाठी भरपूर बर्फ उपलब्ध असूनही खेळाडूंना चांगल्या सुविधांअभावी स्पर्धात्मक सरावापासून वंचित राहावे लागते.

बर्फाच्छादित प्रदेश नसलेल्या देशांमधील काही खेळाडू हिवाळी ऑलिम्पिकमध्ये पदकांची कमाई करीत असतात. ज्या देशांमध्ये फारसा बर्फ नाही, अशा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचे खेळाडू हिवाळी ऑलिम्पिकपूर्वी एक-दीड वर्षे अगोदर कॅनडा किंवा युरोपियन देशांमध्ये राहून सराव करतात व पदके मिळवितात. आपल्याकडे बर्फच बर्फ आहे. हिवाळी खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांबरोबरच उत्तम प्रशिक्षकांचीही गरज आहे. एरवी अ‍ॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या किंवा संभाव्य ऑलिम्पिकपटूंकरिता भरपूर परदेशी प्रशिक्षक नियुक्त केले जात असतात. त्यांच्यावर कोटय़वधी रुपये खर्च केले जातात, मात्र तेथे ऑलिम्पिकबाबत आपली पाटी कोरीच असते. हे विचारात घेतले तर कधीतरी शासनाने हिवाळी ऑलिम्पिकसाठी परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती केली, तर खेळाडू शासनास दुवा देतील. त्याचप्रमाणे भारतीय प्रशिक्षकांसाठीही प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे हिमालयात हिवाळी क्रीडाप्रकारांसाठी उपलब्ध असलेल्या क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांना विकसित करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे अन्य क्रीडाप्रकारांमधील उदयोन्मुख खेळाडूंना विविध शासकीय आस्थापनांमध्ये शिष्यवृत्ती स्तरावर घेतले जाते, त्याप्रमाणे हिवाळी खेळाडूंनाही अशा संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तसेच सिमला, मनाली, दार्जिलिंग, जम्मू, श्रीनगर, डलहौसी आदी विविध ठिकाणी हिवाळी क्रीडा प्रकारांच्या अकादमी स्थापन करून त्याद्वारे नियोजनबद्ध विकासाचा कार्यक्रमही घेता येईल. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने त्या दृष्टीने योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे. केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड हे स्वत: ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते नेमबाज आहेत. त्यांना ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी किती कष्ट पडतात याची जाणीव आहे. त्यांनी हिवाळी क्रीडापटूंची निराशा दूर करण्यावर भर दिला पाहिजे. नियोजनबद्ध विकासाचा कार्यक्रम सुरू केला, तर शिवा केशवनसारखे अनेक खेळाडू आपल्या देशात घडविता येतील.

– मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com