माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचे शनिवारी निधन झाले. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना आदरांजली म्हणून दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियमला माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी केली होती. त्यानंतर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने (DDCA) स्टेडियमला जेटली यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे (DDCA) चे अध्यक्ष रजत शर्मा यांनी ही माहिती दिली.

अरुण जेटली यांचा राजकीय प्रवास अनेकांना ज्ञात आहे, पण त्यांनी अनेक क्रिकेटपटू घडवण्यातही  मोठा वाटा उचलला. त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच भारतीय क्रिकेटला वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आशिष नेहरा, विराट कोहली, ऋषभ पंत यांसारखे खेळाडू मिळू शकले. याशिवाय जेटली यांच्या कार्यकाळात त्या स्टेडियमला एक नवे आणि अत्याधुनिक रुप प्राप्त झाले होते. या स्टेडियममध्ये अव्वल दर्जाचे ड्रेसिंग रूम बांधण्यात आले. त्यातही जेटली यांचे योगदान होते. या स्टेडियममध्ये चांगल्या सुविधा आणि प्रेक्षकांना बसण्याची आसनक्षमता या बाबींकडे त्यांनी लक्ष पुरवले. स्टेडियममधील आसनक्षमता वाढवण्याच्या मुद्द्यावर त्यांनी पाठपुरावा केला आणि त्याप्रकारे योजनांची अंमलबजावणी करून घेतली.

दरम्यान, हा नामकरण सोहळा १२ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात पार पडणार आहे. यातील एका स्टँडला विराट कोहलीचे नावदेखील देण्यात येणार आहे. याची घोषणा आधीच करण्यात आली होती. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पार पडणाऱ्या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि क्रीडामंत्री किरेन रिजिजू हेदेखील उपस्थित राहणार आहेत.