काबूल : क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये स्वतंत्र नेतृत्व असावे, या धोरणामुळे अफगाणिस्तानच्या कर्णधारपदावरून असगर अफगाणची हकालपट्टी करण्यात आली आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दोन महिन्यांवर आली असताना अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने घेतलेल्या या निर्णयाबाबत संघातील वरिष्ठ खेळाडू रशीद खान आणि मोहम्मद नबी यांनी नाराजी प्रकट केली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने असगरकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधारपद काढून घेतले आहे. रहमत शाहकडे कसोटी, गुलबदिन नैबकडे एकदिवसीय आणि रशीदकडे ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

३१ वर्षीय असगरने २०१५मध्ये नबीकडून अफगाणिस्तान संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पूर्ण सदस्यत्व लाभले असून, मागील महिन्यात डेहराडून येथे या संघाने आर्यलडविरुद्ध आपला पहिलावहिला कसोटी विजय साजरा केला होता.

गतवर्षी झालेल्या आयसीसी विश्वचषक पात्रता क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत अफगाणिस्तानने वेस्ट इंडिजला नमवून विजेतेपद पटकावले होते. असगरच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानच्या संघाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये ५९ पैकी ३७ सामने जिंकले आहेत.