आतापर्यंत बऱ्याचदा अ‍ॅशेस मालिका जिंकलेली असली तरी या पारंपरिक स्पर्धेत ४-० असा ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या दिशेने इंग्लंडने पाचव्या कसोटी सामन्यात कूच केली होती, पण त्यांना ऐतिहासिक विजयापासून वंचित रहावे लागली. पाचवा सामना अनिर्णित राहीला असला तरी इंग्लंडने ही अ‍ॅशेस ३-० अशी खिशात टाकली. अखेरच्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ३७७ धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियाने सामना जिंकण्याच्या दृष्टीने एकदिवसीय शैलीत क्रिकेट खेळत दुसरा डाव १११ धावांवर घोषित केला आणि इंग्लंडपुढे विजयासाठी २७७ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना केव्हिन पीटरसन (६२) आणि जोनाथन ट्रॉट (५९) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने ५ बाद २०६ अशी मजल मारली.

ब्रॅड हॅडिनचा विश्वविक्रम
एका मालिकेत यष्टीमागे सर्वाधिक बळी टिपण्याचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक बॅड्र हॅडिन याने आपल्या नावावर केला आहे. हॅडिनने यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेत यष्टीमागे २९ बळी टिपले. अ‍ॅशेसच्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात जो रूटचा झेल टीपत हॅडिनने विश्व विक्रमाला गवसणी घातली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक रॉडनी मार्श (२८) यांच्या नावावर हा विश्वविक्रम होता.