इंग्लंडने यापूर्वीच अ‍ॅशेस मालिका खिशात टाकली आहे, पण तरीही ही लढत दोन्ही संघांसाठी सन्मानाची असेल. अखेरचा सामनाही जिंकून मालिका ४-१ अशा मोठय़ा फरकाने जिंकण्याचे इंग्लंडचे ध्येय असेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कचा आणि सलामीवीर ख्रिस रॉजर्स यांचा हा अखेरचा सामना असल्यामुळे त्याच्यावर साऱ्यांच्याच नजरा असतील.
चौथ्या सामन्यात इंग्लंडने एक डाव ७८ धावांनी दमदार विजय मिळवत अ‍ॅशेस चषक आपल्या खिशात टाकला होता. त्यामुळे या सामन्यात त्यांच्यावर कसलेच दडपण नसेल. गेल्या सामन्यात त्यांच्या वेगवान माऱ्याने ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवली होती. पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉड आणि दुसऱ्या डावात बेन स्टोक्सने भेदक मारा करत इंग्लंडला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे त्यांच्याकडून संघाला सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल. फलंदाजीमध्ये कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक चांगली कामगिरी करत असून त्याला जो रुट चांगली साथ देत आहे. दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन या कसोटीतही खेळू शकणार नाही.
ऑस्ट्रेलियाचा संघ हा व्यावसायिक असल्याचे म्हटले जात असले तरी त्यांच्यासाठी हा सामना थोडासा भावुक नक्कीच असेल. कारण आतापर्यंत संघाला विजयांची मालिका दाखवणारा, मोक्याच्या क्षणी संघाच्या पाठीमागे ठाम उभा राहणाऱ्या क्लार्कचा हा अखेरचा सामना असेल, त्याचबरोबर सलामीवीर रॉजर्सही या सामन्यानंतर क्रिकेटला अलविदा करणार आहे. ऑस्ट्रेलियाला या मालिकेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दुसरा सामना जिंकल्यावर ऑस्ट्रेलिया मालिकेत दमदार पुनरागमन करेल, असे वाटले होते. पण ऑस्ट्रेलियाच्या संघाने शस्त्र खाली टाकल्याचेच यावेळी दिसून आले. त्यामुळे हा संघ आपल्या कर्णधाराला शेवटचा सामना जिंकवून देणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

प्रतिस्पर्धी संघ
इंग्लंड : अॅलिस्टर कुक (कर्णधार), जेम्स अँडरसन, मोइन अली, जॉनी बेअरस्टोव्ह, इयान बेल, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टिव्हन फिन, अॅडम लिथ, लायम प्लंकेट, जो रुट, आदील रशिद, बेन स्टोक्स, मार्क वूड.
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, ख्रिस रॉजर्स, शॉन मार्श, मिचेल मार्श, ब्रॅड हॅडिन, पीटर नेव्हिल, मिचेल जॉन्सन, जोश हॅझेलवूड, पीटर सिडल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, फवाद आलम, शेन वॉटसन, अॅडम व्होग्स.
वेळ : दु. ३.३० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.