ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने दुखापतीतून सावरत पुनरागमन करताना कारकीर्दीतील तिसरे द्विशतक झळकावले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात पहिल्या डावात ८ बाद ४९७ धावांपर्यंत मजल मारली. तर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने १ बाद २३ धावा केल्या.

स्मिथने या सामन्यात ३१९ चेंडूत २११ धावा केल्या. या खेळीत त्याने २४ चौकार आणि २ षटकार लगावले. स्मिथचे हे कसोटी कारकिर्दीतील तसेच अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसरे द्विशतक ठरले. त्यामुळे तो मालिकेमध्ये सर्वाधिक द्विशतके करण्याच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला. सर डॉन ब्रॅडमन आणि वॅली हॅमंड यांच्यापाठोपाठ स्मिथने ही कामगिरी केली. पण स्मिथने एक अशी कामगिरी केली, जी दिग्गज क्रिकेटपटूंना करता आला नाही. स्मिथने २०१५, २०१७ आणि २०१९ अशा सलग तीन अ‍ॅशेस मालिकेत प्रत्येकी एक द्विशतक केले. सलग तीन अ‍ॅशेस मालिकेत द्विशतक करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

अ‍ॅशेसमध्ये त्याने जुलै २०१५ मध्ये लॉर्ड्सवर २१५ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने २०१७ च्या अ‍ॅशेसला पर्थमध्ये २३९ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने गुरूवारी अ‍ॅशेस मालिकेत चौथ्या कसोटीत द्विशतकी खेळी केली आहे.

दरम्यान, अ‍ॅशेस मालिकेत दुसऱ्या दिवशी ३ बाद १७० धावसंख्येवरून खेळाला सुरुवात झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेडचा (१९) बळी गमावला. त्यानंतर मॅथ्यू वेडलाही (१६) मोठी खेळी करण्यात अपयश आले. ५ बाद २२४ अशी स्थिती असताना स्मिथने कर्णधार टिम पेनच्या साथीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या गडय़ासाठी १४५ धावांची अभेद्य शतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत आणले.