क्रिकेटच्या मैदानात आपण आतापर्यंत फलंदाजांना एकाहून एक उत्तुंग षटकार ठोकताना पाहिलेलं आहे. मात्र ऑस्ट्रेलियात सध्या सुरु असलेल्या बिगबॅश लीग स्पर्धेत एका फलंदाजाने मारलेला उत्तुंग फटका सीमापार न जाताही त्याला षटकार म्हणून घोषित करण्यात आलं. पर्थ स्क्रॉचर्स विरुद्ध मेलबर्न रेनिगेड्स या सामन्यात हा प्रकार घडला आहे.

अवश्य वाचा – क्रिकेट सामन्यात नाट्यमय घडामोड ! मैदानातील खेळाडूंनी बदलला तिसऱ्या पंचांचा निर्णय

मेलबर्नच्या मार्वल स्टेडीयमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळवण्यात येत होता. नाणेफेक जिंकून मेलबर्न रेनिगेड्सच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डॅनिअल ख्रिश्चन टाकत असलेल्या १२ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टर्नरने हवेत फटका खेळला. मात्र मार्वल स्डेडीयम हे बंदीस्त स्टेडीयम असल्यामुळे चेंडू सीमापार जाण्याऐवजी छताला लागून परत मैदानातच येऊन पडला. नियमानुसार असा फटका हा षटकार म्हणून घोषित करण्यात येतो. यावेळी समालोचन करत असलेल्या ब्रेट ली आणि शेन वॉर्न यांनीही या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.

महत्वाची गोष्ट म्हणजे हा फटका खेळणाऱ्या टर्नरनेही हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. ” हा निर्णय मला योग्य वाटत नाही, यामुळे आज मी मारलेला फटका षटकार घोषित करण्यात आला असला तरीही. पण माझ्यामते अशा परिस्थितीमध्ये तो बॉल डेड बॉल म्हणून घोषित करायला हवं. छताला लागलेला फटका हा षटकार जाणार आहे की झेल जाणार आहे याचा अंदाज लावता येत नाही.” अखेर मेलबर्न रेनिगेड्सने पर्थ स्क्रॉचर्स संघाने दिलेलं १०४ धावांचं आव्हान १५.२ षटकात पूर्ण करत ४ गडी राखत सामना जिंकला.