News Flash

विकासची आगेकूच

बॉक्सिंगमध्ये भारतीय खेळाडूंसाठी सोमवारचा दिवस निराशाजनक ठरला. विकास कृष्णन (७५ किलो) याचा अपवाद वगळता अन्य तीन खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले.

| September 30, 2014 04:49 am

बॉक्सिंग
बॉक्सिंगमध्ये भारतीय खेळाडूंसाठी सोमवारचा दिवस निराशाजनक ठरला. विकास कृष्णन (७५ किलो) याचा अपवाद वगळता अन्य तीन खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले. गौरव भिदुरी (५२ किलो), मनदीप जांगरा (६९ किलो) व कुलदीपसिंग (८१ किलो) यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभवास सामोरे जावे लागले.
माजी जागतिक कांस्यपदक विजेता विकास याने किर्गिझस्तानच्या कानेबेक उलु अझामत याच्यावर ३-० असा शानदार विजय मिळविला. मिडलवेट गटात ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदरसिंग याने माघार घेतल्यामुळे विकासला या गटात संधी मिळाली. विकासला आता उजबेकिस्तानच्या नार्मोतोव्ह हुर्शिबेक याच्याशी खेळावे लागणार आहे.
आशियाई रौप्यपदक विजेता मनदीप याला थायलंडच्या सेन्सित अपीचेत याने ३-० असे हरविले. भिदुरी याला उजबेकिस्तानच्या झोरीव्ह शाखोबिदीन याने ३-० अशाच फरकाने पराभूत केले.
राष्ट्रीय विजेता कुलदीप याचा इराणच्या रौझबाहानी एहसान याने ३-० असा सहज पराभव केला.    

थायलंडवर दणदणीत विजय
कबड्डी
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहा वेळा सुवर्णपदक विजेत्या पुरुष कबड्डी संघाने प्राथमिक फेरीच्या लढतीत थायलंडचा ६६-२७ असा धुव्वा उडवला. आतापर्यंत झालेल्या पाचही विश्वचषकांचे जेतेपद नावावर करणाऱ्या भारताच्या पुरुष संघाने थायलंडला पूर्णपणे निष्प्रभ ठरवत आगेकूच केली. भारतीय संघाने मध्यंतराला २९-१५ अशी आघाडी घेतली. ही आघाडी वाढवत त्यांनी हा मुकाबला ३७-१२ असा जिंकला. भारतीय संघाने पाच बोनस गुणांची कमाई केली. सलामीच्या लढतीत भारताने बांगलादेशला नमवले होते. ‘अ’ गटात भारतासह पाकिस्तान, थायलंड, बांगलादेश यांचा समावेश आहे. प्राथमिक फेरीच्या शेवटच्या लढतीत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

निराशाजनक
कनॉॅइंग
कनॉइंग आणि कयाकिंग प्रकारात भारतीयांची कामगिरी निराशाजनक झाली. १००० मीटर कनॉइंग सिंगल शर्यत पूर्ण करण्यासाठी गौरव तोमारला ४ तास १७ मिनिटे लागली. त्याला सातवे स्थान मिळाले. ‘के१’ कयाकिंग प्रकारात अल्बर्ट राज सेल्वाराजला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. कनॉइंग पुरुष दुहेरी ‘सी२’ प्रकारामध्ये अजित कुमार आणि राजू रावत यांना पाचवे स्थान मिळाले. रागिना राव, बिजू, अनुषा, सोनिया देवी आणि नॅनो देवी अहोगंशबागम कयाकिंग प्रकारात ‘के४’ ५०० मी. प्रकारात सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अजित सिंग, सनी कुमार, रमेश गोळी आणि चिंगहिंग सिंग अब्राहमला १००० मीटर ‘के४’ प्रकारात आठवे स्थान मिळाले.

संमिश्र दिवस
टेबल टेनिस
भारतीय टेबल टेनिसपटूंसाठी सोमवारचा दिवस संमिश्र ठरला. महिला दुहेरीच्या संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात केली, मात्र मिश्र दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले.
पौलमी घटक आणि अंकिता दास जोडीने पाकिस्तानच्या शबनम बिलाल आणि राहिला काशिफ जोडीवर ११-५, ११-१, ११-७ अशी मात केली.
थायलंडच्या पाडासक तनविरीयचाकुल आणि सुथासिनिन सॉवेटाबट जोडीने अचंता शरथ कमाल आणि पौलमी घटक जोडीवर ११-६, ११-९, १६-१४ असा विजय मिळवला.  
अँथनी अमलराज आणि मधुरिका जोडीने मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. या जोडीने मंगोलियाच्या मुन्ख ओरगिल बाटबायर-इन्कजिन बारखास जोडीचा १२-१०, ११-३, ११-६ असा पराभव केला. नेहा अगरवाल आणि मधुरिका जोडीने मालदीवच्या ऐशाथ निसा आणि अमिनाथ शियुरा शरीफ जोडीला ११-३, ११-६, ११-२ असे नमवले.  

यजमानांकडून पराभूत
हॉकी
भारतीय महिला हॉकी संघाचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. उपांत्य फेरीच्या लढतीत यजमान दक्षिण कोरियाने भारतावर ३-१ असा विजय मिळवला. तिसऱ्याच मिनिटाला किम डारेआने भारताची गोलरक्षक सविताला भेदत अचूक गोल करत कोरियाचे खाते उघडले. अकराव्या मिनिटाला नमिता टोप्पोने शानदार गोल करत बरोबरी करून दिली. यानंतर कोरियाने कोंडी फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले मात्र ते अपुरे ठरले. २८व्या मिनिटाला हान ह्य़ुलयोंगने गोल करत कोरियाला आघाडी मिळवून दिली. ४२व्या मिनिटाला पार्क मिहयुनने भारताच्या ढिसाळ बचावाचा फायदा उठवत गोल केला. शेवटच्या सत्रात भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र जसप्रीत कौरला याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. कांस्यपदकासाठीच्या लढतीत भारतीय संघाचा सामना जपानशी होणार आहे.
पुरुषांची यजमानांशी लढत
हॉकीमध्ये १६ वर्षांचा सुवर्ण दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक भारतीय पुरुष संघाचा आता दक्षिण कोरियाशी मुकाबला होणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने चीनवर २-० असा विजय मिळवला होता. चीनला नमवत भारतीय संघाने अंतिम चारमध्ये धडक मारली होती. धनराज पिल्लेच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने १९९८ साली बँकॉक येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. भारताने सुवर्णपदक पटकावल्यास रिओ ऑलिम्पिकचे तिकीटही मिळू शकते. बचावातील त्रुटी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत स्पष्ट झाल्या होत्या. भारताचे आक्रमण आणखी भेदक होण्याची आवश्यकता आहे. रुपिंदरपाल सिंग दुखापतग्रस्त झाल्याने भारताच्या डावपेचात बदल झाले आहेत. चार वेळा सुवर्णपदक विजेत्या कोरिया संघाला कमी लेखणे भारताला महागात पडू शकते.

मंगोलियावर विजय
बास्केटबॉल
गेल्या काही दिवसांपासून निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला बास्केटबॉल संघाला अखेर विजय गवसला. भारताने मंगोलियाला ६८-५० असे पराभूत करत पराभवाचा दुष्काळ संपवला. पाचव्या स्थानासाठी आता भारताला कझाकिस्तानशी सामना करावा लागणार आहे.

पुरुष विजयी, महिला पराभूत
सेपॉकटकरॉ
सेपॉकटकरॉ खेळात भारताच्या पुरुष संघाने ब्रुनेई आणि नेपाळवर विजय मिळवला तर महिलांमध्ये इंडोनेशियाने भारतावर मात केली. रेगू प्रकारात पुरुष संघाने ब्रुनेई संघाला २१-१२, २१-१५ असे नमवले. नेपाळने निर्धारित वेळेत सामना सुरू न केल्याने भारताला विजयी घोषित करण्यात आले. महिलांमध्ये इंडोनेशियाने भारताचा २१-१२, २१-१३ असा धुव्वा उडवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 4:49 am

Web Title: asian games 2014 day 10 highlights
टॅग : Asian Games
Next Stories
1 शाबास रे पठ्ठे !
2 फॉम्र्युलावर एमसीए चर्चा करणार
3 सात डिसेंबरला पुणे मॅरेथॉन शर्यत
Just Now!
X