आशियाई क्रीडा स्पर्धेत १९९० मध्ये कबड्डीचा समावेश झाला. मात्र तेव्हापासून आतापर्यंत भारताने सुवर्णपदकावरील वर्चस्व कधीही गमावले नाही. २०१४च्या इन्चॉन आशियाई स्पध्रेत भारताला इराणने कडवी टक्कर दिली; परंतु तरीही जेतेपद भारताने खेचून आणले. यंदाच्या कबड्डीचे सामने १९ ते २४ ऑगस्ट या कालावधीत होणार असून, भारताच्या सोनेरी अभियानाला रविवारपासून प्रारंभ होणार आहे.

पुरुषांमध्ये अ-गटात समावेश असलेल्या भारताला साखळीत दक्षिण कोरिया, बांगलादेश, थायलंड आणि श्रीलंका यांचे आव्हान असेल, तर महिलांच्या अ-गटात भारताला साखळीत थायलंड, जपान, श्रीलंका आणि इंडोनेशिया यांचा सामना करावा लागेल. रविवारी पहिल्या दिवशी पुरुष संघाला बांगलादेश आणि श्रीलंका या शेजारील राष्ट्रांशी भिडावे लागणार आहे, तर महिलांची सलामी जपानशी रंगणार आहे. पुढील रविवारी, २४ ऑगस्टला दोन्ही गटांचे अंतिम सामने होणार आहेत.

भारताची दुसरी दुहेरीची जोडी निश्चित

अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसने माघारीचा निर्णय घेतल्यावर मुख्य स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे २४ तास शिल्लक असतानाच भारतीय टेनिस संघाने पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या जोडीची निवड केली आहे. पेसच्या साथीने खेळण्यासाठी प्रथम पसंती असलेल्या सुमित नागलची एकेरीतील रामकुमार रामनाथनशी जोडी निश्चित करण्यात आली असून पहिली पुरुष दुहेरी जोडी रोहन बोपण्णा व दिविज शरण यांची असणार आहे.