१८ ऑगस्टपासून इंडोनेशियातील जकार्ता शहरात होणाऱ्या आशियाई खेळांसाठी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जाँगला आमंत्रण देण्यात आलेलं आहे. इंडोनेशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच किम जाँग यांची भेट घेऊन, स्वागत सोहळ्यासाठी हजर राहण्याची विनंती केली आहे. इंडोनेशियाच्या मनुष्यबळ आणि सांस्कृतिक मंत्री पन महारानी यांनी आपल्या देशाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या नावाने किंम जाँग यांना जकार्ता येथे हजर राहण्याचं आमंत्रण दिल्याचं समजतंय. इंडोनेशिया पोलिसांच्या प्रवक्त्यांकडून या घटनेला दुजोरा देण्यात आलेला आहे.

किम जाँग यांच्या सुरक्षेची सर्व काळजी घेण्यात येणार असून, इंडोनेशिया पोलिसांच्या एका खास पथकावर किम जाँग यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अणुचाचणीवरुन उत्तर आणि दक्षिण कोरियामधले संबंध ताणले गेले होते, मात्र यानंतर दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकत्र येऊन या गोष्टीवर तोडगा काढण्याचं मान्य केलं होतं. याचसोबत उत्तर कोरियासोबत आपले राजकिय संबंध सुधारले जावेत यासाठीही इंडोनेशियन सरकार प्रयत्नशील राहणार आहे. याचसाठी किम जाँगला आशियाई खेळांच्या स्वागत समारंभाला हजर रहाण्याचं आमंत्र देण्यात आल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे.