भारतीय संघाविरोधात खेळण्यासाठी उत्सुक; मात्र कारवाईचे दडपण

आशियाई क्रीडा स्पर्धेतील मैदानी लढाईत कबड्डीमधील हक्काची सुवर्णपदके गमावल्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १५ सप्टेंबरला दिल्लीत होणाऱ्या दोन सामन्यांमध्ये भारतीय कबड्डी संघांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भारतीय संघाला आव्हान देऊ शकणारा संघ तयार करण्यासाठी देशातील कबड्डीक्षेत्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या संघात सहभागी होण्यासाठी खेळाडू उत्सुक असले तरी त्यांच्यावर कारवाईचे दडपण आहे.

दिल्लीला होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवू न शकलेल्या देशातील अव्वल कबड्डीपटूंना या संघातून खेळण्यासाठी विचारणा केली जात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र जनार्दनसिंग गेहलोत यांचे भारतीय कबड्डीवरील नियंत्रण कायदेशीरपणे संपुष्टात आले असले, तरी संघटनात्मक नियंत्रण गमावले नसल्यामुळे खेळाडू द्विधा मन:स्थितीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेबाबत आक्षेप घेणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात माजी अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू होनप्पा गौडा यांनी सादर केली होती. यावर निकाल देताना न्यायालयाने निवड प्रक्रियेसाठीचे दोन सामने १५ सप्टेंबरला दिल्लीच्या त्यागराज क्रीडा संकुलात सकाळी ११ वाजता आयोजित करण्याचे निर्देश आले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघातून खेळलेल्या प्रत्येकी १२ खेळाडूंशी झुंजण्यासाठी डावललेल्या किंवा अन्य खेळाडूंना या नव्या भारतीय संघात स्थान मिळू शकेल. न्यायालयीन दावा करणाऱ्या होनप्पा आणि एस. राजरत्नम यांच्याशी पाठीशी असलेली नवे भारतीय हौशी कबड्डी महासंघ संघबांधणीसाठी प्रयत्नशील आहेत.

‘‘आशियाई स्पर्धेतील भारताच्या संघात मध्य रक्षणाचा मोठा अभाव होता. याचप्रमाणे सुरजित, नितीन तोमर, सुरेंदर नाडा, सुकेश हेगडे, प्रशांत राय, विशाल भारद्वाज, विकास काळे, सचिन शिंगार्डे, नीलेश साळुंखे यांच्यासारख्या असंख्य गुणी खेळाडूंना भारतीय संघातून डावलण्यात आले होते. निवड प्रक्रियेच्या सामन्यांसाठी आमची संघबांधणी अंतिम टप्प्यात असून, विशेष तयारी शिबिराला लवकरच प्रारंभ होणार आहे,’’ अशी माहिती नव्या भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे समन्वयक जया शेट्टी यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘भारतीय संघाशी संलग्न असलेल्या राज्य संघटना तसेच रेल्वे, सेनादल या संघांवर या सामन्यात न खेळण्यासाठी दडपण आणले जात आहे. कारण भारतीय कबड्डी संघटनेविरोधातील हे कृत्य असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. मात्र कबड्डीच्या हितासाठी ही प्रक्रिया होत आहे, याची जाणीव खेळाडूंना व्हायला हवी.’’

निवृत्त जिल्हा न्यायाधीश रविंदर कौल या सामन्यांसाठी निरीक्षक म्हणून काम पाहतील. या निवड प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण करण्यात येईल आणि ते नंतर न्यायालयासमोर सादर केले जाईल. या सामन्यांसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांकडून तीन निवड समिती सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेतील आक्षेपार्ह खेळाडूंच्या कामगिरीचा या वेळी कस लागेल. ते या निवड प्रक्रियेत यशस्वी ठरले, तरच त्यांना पदकविजेत्याला मिळणारे आर्थिक इनाम आणि अन्य लाभ मिळणार आहेत. या खटल्याची पुढील सुनावणी ३० ऑक्टोबरला आहे.