नवी दिल्ली : आशू, आदित्य कुंडू आणि हरदीप या भारताच्या कुस्तीपटूंनी आपापल्या गटात विजय मिळवत आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत बुधवारी कांस्यपदकाची कमाई केली.

भारताने ग्रीको-रोमन प्रकारात एकूण पाच पदके मिळवली. आशूने ६७ किलो वजनी गटात तर आदित्य आणि हरदीपने अनुक्रमे ७२ आणि ९७ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले.

आशूने सिरियाच्या अब्दुलकरीम मोहम्मद अल-हसन याच्यावर ८-१ अशी सहज मात केली. आदित्यने अवघ्या दीड मिनिटे रंगलेल्या एकतर्फी लढतीत जपानच्या नाओ कुसाका याचा ८-० असा धुव्वा उडवला. त्यानंतर हरदीपने किर्गिजिस्तानच्या बेकसुलतान मखामादझानोव्हिच मखमुदोव्ह याला ३-१ असे हरवले.

भारताने या स्पर्धेत आतापर्यंत पाच पदके मिळवली असून त्यात सुनील कुमारच्या सुवर्णपदकाचा आणि अर्जुन हालाकुकरी याच्या कांस्यपदकाचा समावेश आहे. तत्पूर्वी, ग्यानेंद्र याला कांस्यपदकासाठीच्या लढतीत ०-६ असा पराभवाचा सामना करावा लागला.