धावपटू कविता राऊत विवाहबद्ध
मैदानात धावण्यापेक्षा नववधूच्या पेहरावात दीड, दोन तास एकाच ठिकाणी उभे राहणे अधिक कठीण आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आंतरराष्ट्रीय धावपटू ‘सावरपाडा एक्सप्रेस’ कविता राऊत सोमवारी दुपारी येथे महेश तुंगार यांच्याशी विवाहबद्ध झाली.
राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवून नाशिक जिल्ह्यातील सावरपाडा या एका छोटय़ाशा आदिवासी पाडय़ाला थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवणाऱ्या कविताच्या विवाह सोहळ्यास ग्रामीण भागातून बहुसंख्य मंडळी उपस्थित होती. भोसला सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर कविताबरोबर सराव करणारे सहकारी, तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्यासह बंगळूरू येथील शिबीरातील तिची मैत्रीण आंतरराष्ट्रीय धावपटू सुधा सिंग यांनी हजेरी लावली होती.
लग्नाच्या पाच दिवसआधी कविताने पतियाळा येथे झालेल्या फेडरेशन चषक राष्ट्रीय वरिष्ठ मैदानी स्पर्धेत १० हजार मीटर अंतर ३५:३०:२१ वेळेत कापून सुवर्णपदक मिळवले होते. लग्नानंतरही आपण मैदान सोडणार नसल्याचे कविताने स्पष्ट केले.
‘‘अॅथलेटिक्समुळे मला सर्व काही मिळाले, त्यामुळे आता देण्याची वृत्तीही ठेवावी लागेल,’’ असे मत कविताने मांडले.
लग्नानंतर विश्रांती न घेता ती १० ते १२ मे या कालावधीत बालेवाडी येथे होणाऱ्या आंतरराज्य मैदानी स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यानंतर ५ ते ७ जून दरम्यान चेन्नईत होणाऱ्या आशियाई मैदानी स्पर्धेपर्यंत कविता घरापासून दूरच राहणार आहे. कविता ही आंतरराष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे तिच्या या व्यस्त कार्यक्रमांचा स्वीकार करणे आपल्यासाठी आनंददायकच असल्याची प्रतिक्रिया तिचे पती महेश तुंगार यांनी व्यक्त केली. तुंगार हे नाशिकजवळील एकलहरे येथे ‘महाजेनको’ मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहेत.