|| प्रशांत केणी

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील भारताच्या कसोटी यशाचे गणित वृत्ती, पुनरावृत्ती आणि संस्कृती या तीन शब्दांत सामावले आहे. ऑस्ट्रेलियात परिस्थिती मुळीच अनुकूल नव्हती. ज्याच्यावर सर्वाधिक विसंबून राहायचे ठरवलेले, त्या कर्णधार विराट कोहलीने पितृत्वाची रजा निश्चित केली होती. प्रत्येक सामन्यागणिक दुखापतींचा आकडा वाढत होता. अखेरीस ब्रिस्बेनला तर मोजक्या अनुभवी खेळाडूंसह भारताची दुसरी फळी मैदानावर उतरली. प्रेक्षकांकडूनही भारतीय खेळाडूंबाबत वर्णद्वेषात्मक टिप्पणी झाल्याने मालिकेतील क्रिकेटमय वातावरणाला गालबोट लावले. पण तरीही भारतीय खेळाडूंनी बाळगलेल्या वृत्तीमुळे ऑस्ट्रेलियात २०१८च्या ऐतिहासिक यशाची पुनरावृत्ती करता आली.

वृत्ती :- वृत्तीतून व्यक्तिमत्त्वे उलगडतात, मग ती व्यक्तीची असो वा संघाची. भारताच्या यशासाठी ही वृत्ती अत्यंत महत्त्वाची ठरली. अ‍ॅडलेडच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने शरणागती पत्करली. यातील दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त ३६ धावांत पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारत ०-४ अशा पद्धतीने गमावणार असे अंदाज वर्तवले गेलेले. अजिंक्य रहाणेला प्रभारी संघनायक म्हणून बळीचा बकरा केला जाणार हेसुद्धा निष्कर्ष काढले गेले. दुखापतीमुळे प्रमुख खेळाडूंच्या अनुभवाचा आलेख एकीकडे मंदावत असताना नवोदितांचे पारडे जड होत चालले. पण अजिंक्य आणि शिलेदारांनी त्याची तमा बाळगली नाही. भारताचा गोलंदाजीचा मारा बदलत गेला, परंतु मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन हा ऑस्ट्रेलियाचा जगातील सर्वोत्तम मारा चारही कसोटी सामन्यांत समान होता. पण भारताच्या झुंजार वृत्तीपुढे त्यांची मात्रा चालली नाही. या गोलंदाजांचा सामना करीत ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर कसा नांगर टाकायचा, हे चेतेश्वर पुजाराने दाखवून दिले, तर तणावमुक्त आक्रमकता कशी अंगीकारायची, हे पंतने सिद्ध केले. कौटुंबिक निर्णय घेताना कर्तव्याला महत्त्व देणे, हे सर्वांनाच जमत नाही. मोहम्मद सिराजने क्रिकेटपटू बनावे, हे त्याच्या रिक्षाचालक वडिलांचे स्वप्न. तो ऑस्ट्रेलियात असतानाच वडिलांनी जगाचा निरोप घेतला. पण सिराजने तिथेच थांबण्याचा निर्णय घेत क्रिकेटपटू होण्याची स्वप्नपूर्ती केली आणि वडिलांना आगळी श्रद्धांजली वाहिली. टी. नटराजननेही पितृत्वाची रजा टाळून मायदेशात परतल्यावर आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला पाहिले. १८ वर्षांचा असताना विराटने वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारत रणजी सामन्यातील अखेरच्या दिवशी दिल्लीला पराभवापासून वाचवले होते. पण यावेळी विराटने कौटुंबिकतेला प्राधान्य दिले. त्याच्या या निर्णयामुळे तो टीकेचा धनी झाला.

पुनरावृत्ती :- ऑस्ट्रेलियात २०१८मध्ये भारताने प्रथमच कसोटी मालिका २-१ अशी जिंकण्याचे ऐतिहासिक यश संपादन केले. त्यावेळी डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ बंदिवासात होते. पण यावेळी तशी परिस्थिती नव्हती. संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा संघ या आव्हानासाठी सज्ज होता. पण तरीही भारताने यशाची पुनरावृत्ती साधली. अ‍ॅडलेडच्या पराभवानंतर खचलेल्या भारतीय संघाकडून माफक अपेक्षा केल्या जात होत्या. परंतु मेलबर्नला अजिंक्यने विजयाचे सूत्र उलगडले. कुशल नेतृत्व आणि शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिला हादरा दिला. मग सिडनीच्या तिसऱ्या कसोटीत पराभव समोर दिसत असतानाही तो टाळण्याची किमया साधली. पुजारा, ऋषभ पंत झुंजार प्रयत्नांनंतर तंबूत परतल्यावर कसोटी वाचवण्याच्या आशा मावळत चालल्या होत्या. पण रविचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारी जोडीने खेळपट्टीवर ठाण मांडून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना झगडायला लावले आणि कसोटी अनिर्णीत राखली. ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर जोडीने अनपेक्षितरीत्या तारले, तर दुसऱ्या डावात शुभमन गिल आणि पंतने पराभवाचे विजयात आत्मविश्वासाने रूपांतर केले. जसप्रित बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव ही अनुभवी पंचरत्ने नसतानाही सिराज आणि शार्दूलने ऑस्ट्रेलियाच्या मातब्बर फलंदाजांवर अंकुश ठेवला.

संस्कृती :- भारतीय क्रिकेटची संस्कृती बदलली आहे, हेच या विजयाचे फलित आहे. न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका  आणि ऑस्ट्रेलिया या वेगवान गोलंदाजांसाठी नंदनवन मानल्या जाणाऱ्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांची त्रेधातिरपीट उडायची. त्यामुळे या देशांमधील मालिकांमध्ये सामना अनिर्णीत राहिला तरी त्याचे कोडकौतुक व्हायचे. पण दुसरीकडे, देशात फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर याच प्रतिस्पध्र्यांना शरण आणत मर्दुमकी गाजवायची, हे साधेसरळ सूत्र भारताने जोपासले होते. पण २०१९च्या उत्तरार्धात मायदेशात भारताने फिरकीच्या नव्हे, तर वेगवान माऱ्याच्या बळावर यश मिळवले. याचप्रमाणे २०१८ आणि २०२१च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयातही भारताच्या गोलंदाजीच्या माऱ्याने परदेशातील खेळपट्ट्या आत्मसात केल्याचे स्पष्ट झाले. युवा आणि भारत ‘अ’ संघाला मार्गदर्शन करणाऱ्या राहुल द्रविडलाही या यशाचे श्रेय जाते. भारताच्या यशाची शिल्पकार ठरलेली नवी फळी ही द्रविडच्याच प्रयोगशाळेतून घडली आहेत.

prashant.keni@expressindia.com