भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतची ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रानं तोंडभरुन कौतुक केलं आहे. इतकेच नव्हे तर ग्लेन मॅकग्रानं पंतची तुलना थेट अॅडम गिलख्रिस्ट याच्याशी केली आहे. जगातील यशस्वी यष्टीरक्षक फलंदाजापैकी गिलख्रिस्ट एक आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनं ज्याप्रमाणे गिलख्रिस्ट आणि पंत यांच्यातील समानता सांगितली. तीच समानता ग्लेन मॅकग्रानंही सांगितली आहे. पंतची कसोटी कारकीर्दची दणक्यात सुरुवात झाली होती. त्यानंतर खराब फॉर्ममुळे संघातून वगळण्यात आलं होतं. खराब फटका मारुन पंतने अनेकदा आपली विकेट फेकली. त्यामुळे त्याच्यावर टीकाही करण्यात आली होती.

सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतला एकदिवसीय आणि टी-२० मध्ये स्थान मिळालं नव्हतं. पहिल्या कसोटी सामन्यातही साहाला संधी देण्यात आली होती. पहिल्या कसोटी सामन्यात साहा अपयशी ठरल्यामुळे मेलबर्नमध्ये पंतला संधी देण्यात आली. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पंतनं पहिल्या डावात २९ धावांची खेली केली. चांगल्या सुरुवातीनंतर पंतला मोठी खेळी करता आली नाही. ग्लेन मॅकग्राने पंतचं कौतुक करताना म्हटले की, पंतला पाहून मला अॅडम गिलख्रिस्टची आठवण येते. सोनी स्पोर्ट्सशी बोलताना ग्लेन मॅकग्रा म्हणाला की, ‘ऋषभ पंतला पाहिल्यानंतर मला गिलख्रिस्टची आठवण येते. नेहमीच तो मोठा फटका मारताना डगमगत नाही. जर तुम्ही पंतला फलंदाजी करताना पाहिल्यास तुम्हाला गिलख्रिस्टची आठवण येईल. त्याच्यारखेच न घाबरता पंतही फटकेबाजी करत असतो.’

भारताचा माजी वेगवान गोलंदाज आगरकर म्हणाला की, ‘ऋषभ पंत हा खूप प्रतिभावान खेळाडू आहे. तो चेंडू टोलवण्यातही निपुण आहे. सामना कुठल्या पद्धतीचा आहे याची त्याला चांगली समज आहे. त्यामुळे पंतला आणखी काही आंतरराष्ट्रीय सामन्यात संधी द्यायला हवी. तो खूप प्रतिभावंत खेळाडू आहे.’