पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेत २-० अशी आघाडी

कधीही हार न मानणारा संघ, अशी क्रिकेट जगतात ख्याती आहे ती ऑस्ट्रेलियाची. आपल्या या ख्यातीचा प्रत्यय त्यांनी अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही दिला.

अ‍ॅशेस मालिकेतील दुसरी कसोटी १२० धावांनी जिंकत ऑस्ट्रेलियाने  पाच सामन्यांच्या क्रिकेट मालिकेमध्ये २-० अशी आघाडी घेतली. पहिल्या दिवस-रात्र अ‍ॅशेस कसोटीमध्ये इंग्लंडसमोर ३५४ धावांचे आव्हान होते. मात्र मिचेल स्टार्कच्या अचूक माऱ्यासमोर पाहुण्यांचा डाव २३३ धावांत संपला. स्टार्कने निम्मा संघ गारद केला.

पाचव्या आणि अंतिम दिवशी ४ बाद १७६ धावांवरून पुढे खेळणारा इंग्लंड संघ आणखी किती पराभव लांबवतो, याची उत्सुकता होती. त्यांच्या आशा कर्णधार ज्यो रूटवर (६७ धावा) होत्या. मात्र त्याच धावसंख्येवर तो परतला. त्यानंतर उर्वीरत चार फलंदाज ३६ धावांची भर घालून बाद झाले.

जॉनी बेअस्टरे (३६ धावा) आणि डेव्हिड मालन (२९ धावा) यांनीच थोडा प्रतिकार केला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ८८ धावांत ५ बळी घेत उपाहारापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याला जोश हॅझ्लेवुड ऑफस्पिनर नॅथन लियॉन (प्रत्येकी २ बळी) यांची सुरेख साथ लाभली.

स्टार्कने दोन्ही डावांत मिळून आठ बळी घेतले तरी पहिल्या डावातील नाबाद शतकवीर शॉन मार्श याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. सलग दुसऱ्या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. तिसरी कसोटी पर्थमध्ये खेळली जाणार आहे. वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर इंग्लंडला १९७८नंतर विजय मिळवता आलेला नाही.

उंचावलेल्या सांघिक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने आनंद व्यक्त केला आहे. ‘‘सांघिक कामगिरीवर मी नेहमीच विश् वास दाखवला आहे. पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात एक-दोन विकेट झटपट मिळवण्याचा आमचा विचार होता. मात्र स्टार्क तसेच अन्य गोलंदाजांनी अचूक मारा करताना विजयावर शिक्कामोर्तब केले,’’ असे तो म्हणाला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : ८ बाद ४४२(डाव घोषित) आणि १३८ विरुद्ध २२७ आणि २३३(ज्यो रूट ६७, जॉनी बेअस्टरे ३६; मिचेल स्टार्क ५-८८, नॅथन लियॉन २/४५, जोश हॅझ्लेवुड २-४९). निकाल : ऑस्ट्रेलिया १२० धावांनी विजयी. पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी.