विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी चौदा सराव सामने होणार असून पहिल्या लढतीत भारताची यजमान ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे. हा सामना आठ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी व मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये आयोजित केली जाणार आहे. ८ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत अ‍ॅडीलेड, मेलबर्न, सिडनी व ख्राईसचर्च येथे सराव सामने होणार आहेत. भारताचा दुसरा सराव सामना १० फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानबरोबर होईल. हे दोन्ही सामने दिवस-रात्र स्वरूपाचे आहेत.
या स्पर्धेसाठी भारतास ‘ब’ गटात वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, आर्यलड व संयुक्त अरब अमिराती यांच्यासमवेत स्थान देण्यात आले आहे. सराव सामन्यांना अधिकृत एक दिवसीय सामन्यांचा दर्जा राहणार नाही. या सामन्यांमध्ये अकरा खेळाडूंऐवजी पंधरा खेळाडूंना आळीपाळीने खेळण्याची संधी मिळणार आहे. मात्र एका वेळी मैदानावर अकराच खेळाडू राहतील.
विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत १४ फेब्रुवारी रोजी न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यात गाठ पडणार आहे. हा सामना ख्राईसचर्च येथे होणार आहे.
त्याच दिवशी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड हा सामना मेलबर्न येथे होईल.