पर्थ : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाची कामगिरी आता खालावत चालली आहे. पहिल्या तीन सामन्यांत अपराजित राहिलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला चौथ्या सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाकडून

०-४ अशा मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात प्रत्येकी एक आणि चौथ्या सत्रात दोन गोल करत भारताचा धुव्वा उडवला. ब्लेक गोवर्स (१५व्या आणि ६०व्या मिनिटाला) आणि जेरेमी हावर्ड (२०व्या आणि ५९व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी दोन गोल करत ऑस्ट्रेलियाला विजयी केले.

पाचव्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण हरमनप्रीत सिंगने मारलेला फटका ऑस्ट्रेलियाच्या बचावपटूने अडवला. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या पेनल्टी-स्ट्रोकवर ब्लेकने गोल करत यजमानांना आघाडी मिळवून दिली. पाच मिनिटांनंतर ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. दुसऱ्या प्रयत्नांत हावर्डने गोल करत ऑस्ट्रेलियाची आघाडी वाढवली. चौथ्या सत्रात भारताला ५१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण हरमनप्रीतने मारलेला फटका ऑस्ट्रेलियाच्या गोलरक्षकाने अडवला. गोल करण्यासाठी भारताने गोलरक्षकालाही आक्रमणासाठी उतरवले. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने अखेरच्या दोन मिनिटांत दोन गोल करत विजय मिळवला. भारताचा या दौऱ्यातील पाचवा आणि अखेरचा सामना शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.