सलग दुसऱ्या विजयासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने अनुक्रमे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांवर सहजपणे विजय मिळवत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची थाटात सुरुवात केली. आता गुरुवारी नॉटिंगहॅम येथे होणाऱ्या सामन्यात १९७५ आणि १९७९ सालच्या विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिज संघावर वर्चस्व गाजवण्यासाठी पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघ उत्सुक आहे.

११ पैकी तब्बल सात विश्वविजेतेपदे आपल्या नावावर करणाऱ्या वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांनी आतापर्यंत इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध तिन्ही आघाडय़ांवर सरस खेळ करत प्रतिस्पध्र्याचा सात गडी राखून सहज धुव्वा उडवला. त्यानंतर ओशाने थॉमस, आंद्रे रसेल, शेल्डन कॉट्रेल यांच्या वेगवान माऱ्यासमोर पाकिस्तानचा डाव १०५ धावांवर गुंडाळत वेस्ट इंडिजने सात बळी राखून आरामात विजय मिळवला. मात्र वेस्ट इंडिजने सरस धावगतीच्या आधारावर गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले असले, तरी ते अबाधित राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

विंडीजकडे दर्जेदार गोलंदाजांचा भरणा

वेस्ट इंडिजचा संघ फक्त फलंदाजांवर अवलंबून आहे, असे म्हटले जायचे. पण पाकिस्तानविरुद्ध वेगवान गोलंदाजांनी कमाल केल्यामुळे गोलंदाजीतही आपण कमी नाही, हे वेस्ट इंडिजने दाखवून दिले. विशेष म्हणजे, केमार रोच, शॅनन गॅब्रियल यांच्या अनुपस्थितीतही रसेल, कॉट्रेल आणि थॉमस यांनी गोलंदाजीत छाप पाडली. वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांच्या उसळत्या चेंडूंचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी नेटमध्ये कसून सराव केला आहे.

विंडीजची फलंदाजीवर भिस्त

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सराव सामना पावसामुळे होऊ शकला नसला तरी न्यूझीलंडविरुद्ध मात्र वेस्ट इंडिजने ४२१ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यात शाय होपचे शतक, आंद्रे रसेल आणि इविन लुइसच्या अर्धशतकी खेळींचे योगदान मोलाचे होते. सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचे १०६ धावांचे आव्हान पार करताना शाय होप अपयशी ठरला, तरी गेलने अर्धशतकी खेळी केली होती. तिसऱ्या क्रमांकावरील डॅरेन ब्राव्होला मात्र आपला खेळ उंचवावा लागणार आहे. वेस्ट इंडिजकडे १०व्या क्रमांकापर्यंत फलंदाजांची फळी असल्यामुळे फलंदाजांवरच त्यांची भिस्त अवलंबून आहे. रसेल आणि कालरेस ब्रेथवेटच्या आक्रमक फलंदाजीकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची परीक्षा

वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलचा धोका ऑस्ट्रेलियाला सतावत नसून ताकदवान फटक्यांची आतषबाजी करणारे अन्य फलंदाज धोकादायक ठरू शकतात, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला आहे. तुफान लयीत असलेल्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी यंदाची ‘आयपीएल’ गाजवली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यातही आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधडय़ा उडवल्या होत्या.

वॉर्नरसह फिंचला सूर गवसला

सराव सामन्यात इंग्लंडविरुद्ध स्टीव्ह स्मिथ आणि श्रीलंकेविरुद्ध उस्मान ख्वाजाने फलंदाजीत छाप पाडली असली तरी कर्णधार आरोन फिंचच्या कामगिरीविषयी ऑस्ट्रेलियाला चिंता सतावत होती. मात्र सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध  फिंचने ६६ धावांची खेळी करत सूर गवसल्याचे दाखवून दिले. चेंडू फेरफार प्रकरणानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन केलेल्या डेव्हिड वॉर्नरने नाबाद ८९ धावांची खेळी करून  विजयात मोलाची भूमिका निभावली होती.

खेळपट्टीचा अंदाज

ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर दिवसभर ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला असून कोणत्याही क्षणी वरुणराजाचे आगमन होण्याची शक्यता आहे. दमट हवामानामुळे वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून अधिक मदत मिळणार आहे. मात्र आक्रमक फलंदाजी करताना दोन्ही संघाच्या फलंदाजांना छोटय़ा मैदानाचा फायदा होऊ शकतो.

विंडीजच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना ऑस्ट्रेलियाला मानसिकतेत बदल करावा लागेल. गेले चार महिने आम्ही फिरकीवर मेहनत घेतली आहे.     – जस्टिन लँगर ,ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक