एकापेक्षा एक खडतर अडथळे पार करत स्वित्र्झलडच्या स्टॅनिस्लॉस वॉवरिन्काने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. मात्र अंतिम लढतीतच त्याच्यापुढे सगळ्यात कठीण आव्हान उभे ठाकले आहे. नदालचा विजयरथ रोखण्याचे आव्हान वॉवरिन्काला पेलावे लागणार आहे. कोर्टबाहेर एकमेकांचे चांगले मित्र असणारे नदाल आणि वॉवरिन्का जेतेपदासाठी एकमेकांशी झुंजणार आहेत. ही लढाई जिंकल्यास हे नदालचे १४वे ग्रँड स्लॅम जेतेपद असेल तर वॉवरिन्कासाठी मात्र पहिलेवहिले ग्रँड स्लॅम जेतेपद ठरणार आहे.
या दोघांमध्ये आतापर्यंत झालेल्या मुकाबल्यांमध्ये नदालने १२-० असे निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या अंतिम फेरीत खेळण्याचा तगडा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. उपांत्य फेरीत डाव्या हाताला झालेली जखम आणि फेडररसारख्या दमदार प्रतिस्पध्र्याला नमवल्यामुळे नदालचा आत्मविश्वास उंचावला आहे. दुसरीकडे टॉमस बर्डीच, नोव्हाक जोकोव्हिच अशा मानांकित खेळाडूंंचे आव्हान संपुष्टात आणणारा वॉवरिन्का कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. अफाट ऊर्जा आणि जबरदस्त त्वेषाने खेळणारा नदाल तर दुसरीकडे दमदार सव्‍‌र्हिस हे वॉवरिन्काच्या खेळाचे वैशिष्टय़ आहे.