शारापोव्हाला पराभवाचा धक्का; थीम, वॉवरिंका, मुगुरुझा, कर्बर यांचीही दुसऱ्या फेरीत आगेकूच

जागतिक टेनिस क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेला राफेल नदाल आणि गतवर्षांची विम्बल्डन विजेती सिमोना हॅलेप यांनी मंगळवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली.

त्याशिवाय डॉमिनिक थीम, स्टॅनिस्लास वॉवरिंका, गर्बिन मुगुरुझा आणि अँजेलिक कर्बर यांनीसुद्धा विजयी सलामी नोंदवली. मात्र अनुभवी मारिआ शारापोव्हाला सलग तिसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे तिच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या लढतीत स्पेनच्या अग्रमानांकित नदालने ह्य़ुगो डेलिनला ६-२, ६-३, ६-० असे पराभूत केले. ३३ वर्षीय नदालचा दुसऱ्या फेरीत अर्जेटिनाच्या फॅब्रिको डेलबोनिसशी सामना होईल.

स्वित्र्झलडच्या १५व्या मानांकित वॉवरिंकाने डॅमिर झुमूरला दोन तास आणि ५६ मिनिटे रंगलेल्या सामन्यात ७-५, ६-७ (४-७), ६-४, ६-४ असे चार सेटमध्ये नमवले. ऑस्ट्रियाच्या पाचव्या मानांकित थीमने अ‍ॅड्रिअन मॅनारिन्होचा ६-३, ७-५, ६-२ असा पराभव केला. जर्मनीच्या सातव्या मानांकित अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्हने इटलीच्या मार्को सॅचिनाटोवर ६-४, ७-६ (७-४), ६-३ असा विजय मिळवला.

महिला एकेरीत रशियाच्या ३२ वर्षीय शारापोव्हाला क्रोएशियाच्या १९व्या मानांकित डोना व्हेदिचने फक्त १ तास आणि २१ मिनिटांत ६-३, ६-४ अशी धूळ चारली. २००८च्या विजेत्या शारापोव्हाला गतवर्षी विम्बल्डन आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतही पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता. विशेष म्हणजे २०१४ नंतर शारापोव्हाने एकही ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले नसल्यामुळे तिच्या निवृत्तीच्या चर्चाना उधाण आले आहे.

रोमानियाच्या चौथ्या मानांकित हॅलेपने मात्र अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीवर ७-६ (७-५), ६-१ अशी मात करून पुढील फेरी गाठली आहे. जर्मनीच्या १७व्या मानांकित कर्बरने एलिसा कोकाबेटाचा ६-२, ६-२ असा सहज धुव्वा उडवला. स्पेनच्या मुगुरुझाने शेल्बी रॉजर्सवर ०-६, ६-१, ६-० अशी पिछाडीवरून सरशी साधली. मात्र २४व्या मानांकित स्लोन स्टीफन्सला झांग शुआईकडून ६-२, ५-७, २-६ असा पराभव पत्करावा लागल्याने तिचे आव्हान संपुष्टात आले.

बुधवारी पुरुष एकेरीत रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच आणि महिला एकेरीत सेरेना विल्यम्स, नाओमी ओसाका यांच्या दुसऱ्या फेरीतील लढतींचा आनंद टेनिसप्रेमींना लुटता येणार आहे. दरम्यान झ्वेरेव्हने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यास पारितोषिकाची सर्व रक्कम आपण ऑस्ट्रेलियातील वणव्याचा बळी ठरलेल्या कुटुंबीयांना दान करणार आहोत, असे जाहीर केले. त्याशिवाय अन्य खेळाडूंनीही ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही त्याने केली आहे.

भारताचा प्रज्ञेश सलामीलाच गारद

भारताचा पुरुष एकेरीतील आघाडीचा टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनला मंगळवारी पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. नशिबाच्या बळावर मुख्य फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या प्रज्ञेशला जपानच्या तात्सुमा इटोने ६-४, ६-२, ७-५ असे पराभूत केले. त्यामुळे दुसऱ्या फेरीत सर्बियाच्या गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचशी दोन हात करण्याचे प्रज्ञेशचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. प्रज्ञेशच्या पराभवामुळे भारताचेही पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. पुरुष दुहेरीत मात्र भारताचा रोहन बोपण्णा आणि दिविज शरण आपापल्या सहकाऱ्यासह खेळणार असल्याने भारतीय चाहत्यांचे त्यांच्या कामगिरीवर खास लक्ष असेल.