ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा

दुसरा मानांकित राफेल नदाल तसेच पाचव्या मानांकित स्टेपानोस त्सित्सिपास यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व गाजवत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली आहे. महिलांमध्ये अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टी, डॅनिल मेदवेदेव आणि आंद्रेय रुबलेव्ह यांनीही चौथ्या फेरीत मजल मारली आहे.

स्पेनच्या २० ग्रँडस्लॅम विजेत्या नदालने ब्रिटनच्या कॅमेरून नोरीचा तिसऱ्या फेरीत ७-५, ६-२, ७-५ असा पाडाव केला. चाहत्यांविना झालेल्या या सामन्यात नदालने नोरीला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. या विजयासह नदालने ४९व्यांदा गँडस्लॅम स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. ३४ वर्षीय नदालला चौथ्या फेरीत इटलीच्या फॅबियो फॉगनिनी याच्याशी झुंज द्यावी लागेल.

ग्रीसच्या त्सित्सिपासने स्वीडनच्या मिकेल यमेरचा ६-४, ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला. कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी उत्सुक असलेल्या त्सित्सिपासला पुढील फेरीत नववा मानांकित मॅट्टेओ बेरेट्टिनी किंवा रशियाच्या करेन खाचानोव्ह यांच्या विजेत्याशी लढावे लागेल. सातव्या मानांकित आंद्रेय रुबलेव्ह याने स्पेनच्या फेलिसियानो लोपेझ याचे आव्हान एक तास, ३२ मिनिटांत

७-५, ६-२, ६-३ असे परतवून लावत चौथ्या फेरीत प्रवेश केला. त्याची गाठ आता नॉर्वेच्या कॅस्पर रुड याच्याशी पडणार आहे. रुडने मोल्डोव्हाच्या राडू अल्बोट याला ६-१, ५-७, ६-४, ६-४ असे हरवले. रशियाच्या चौथ्या मानांकित डॅनिल मेदवेदेव याने पाच सेटपर्यंत झुंज देत फिलिप क्राजिनोव्हिक याला ६-३, ६-३, ४-६, ३-६, ६-० असे हरवून चौथ्या फेरीत धडक मारली.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या अ‍ॅश्ले बार्टी हिने एकतारिना अलेक्झांड्रोव्हा हिला ६-२, ६-४ असे पराभूत करत चौथ्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले. ऑस्ट्रेलियाच्या अव्वल मानांकित बार्टीची सुरुवातीलाच सर्व्हिस भेदण्यात आली, मात्र त्यानंतर जोमाने पुनरागमन करत बार्टीने अलेक्झांड्रोव्हा हिच्यावर वर्चस्व गाजवले. आता बार्टीला अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्स हिच्याशी दोन हात करावे लागतील. रॉजर्सने इस्टोनियाच्या अ‍ॅनेट कोंटावेट हिला ६-४, ६-३ असे नमवले.

गतजागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला तिसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. चेक प्रजासत्ताकच्या प्लिस्कोव्हाला आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोव्हा हिने ५-७, ५-७ असे पराभूत केले. आता मुचोव्हाला चौथ्या फेरीत बेल्जियमच्या १८व्या मानांकित एलिस मेर्टेन्स हिच्याशी खेळावे लागेल. मेर्टेन्सने स्वित्र्झलडच्या बेलिंडा बेंकिक हिचा ६-२, ६-१ असा सहज पाडाव केला.

युक्रेनच्या पाचव्या मानांकित इलिना स्वितोलिना हिने कझाकस्ताच्या युलिया पुतिनत्सेवा हिच्यावर ६-४, ६-० असे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. स्वितोलिनाला चौथ्या फेरीत अमेरिकेच्या जेसिका पेगुला हिच्याशी लढावे लागेल. पेगुलाने ख्रिस्तिना लाडोनाविक हिच्यावर ६-२, ६-१ अशी मात केली.

बोपण्णा मिश्र दुहेरीतही पराभूत

भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा याला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीतही सलामीच्या लढतीतच गारद व्हावे लागले. बोपण्णा आणि त्याची चीनची साथीदार यिंगयिंग दुआन यांना अमेरिकेची बेथनी मटेक-सँड्स आणि ब्रिटनचा जेमी मरे यांच्याकडून ४-६, ४-६ अशी हार पत्करावी लागली. बोपण्णाचे पुरुष दुहेरीतील आव्हानही पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते.

* वेळ : पहाटे ५.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन २ आणि एचडी वाहिन्या.