Piyush Chawla broke Dwayne Bravo’s record : आयपीएल २०२४ च्या ५१ व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या केकेआरचा संघ १९.५ षटकांत १६९ धावांवर सर्वबाद झाला. मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पियुष चावलाने या सामन्यात एक विकेट घेतली.यासह त्याने ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला.
पियुष चावलाने ड्वेन ब्राव्होचा मोडला विक्रम –
कोलकाता नाईट रायडर्सच्या डावातील सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पियुष चावलाने रिंकू सिंगला झेलबाद केले. रिंकूने ८ चेंडूत ९ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ चौकार मारले. रिंकूच्या विकेटसह पीयूष चावलाने आयपीएलमध्ये १८४ विकेटेस पूर्ण केल्या. ड्वेन आयपीएलमध्ये १८३ विकेट्स घेतल्या आहेत. यासह पियुष चावला आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. या यादीत आघाडीवर युजवेंद्र चहल आहे, ज्याने आयपीएलमध्ये २०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
२०० विकेट्स : युजवेंद्र चहल
१८४ विकेट्स : पियुष चावला
१८३ विकेट्स : ड्वेन ब्राव्हो
१७८ विकेट्स : भुवनेश्वर कुमार</p>
हेही वाचा – MI vs KKR : नुवान तुषाराने केला खास पराक्रम, मुंबईसाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पाचवा गोलंदाज
सामन्याबद्दल बोलायचे, तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला कोलकाता नाईट रायडर्स मुंबई इंडियन्सविरुद्ध संघर्ष करताना दिसला. ५७ धावांवर संघाने पाच विकेट गमावल्या. मुंबईच्या गोलंदाजीसमोर सॉल्ट-नरीनसारखे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. या सामन्यात सॉल्टने पाच धावा, रघुवंशीने १३ धावा, श्रेयस अय्यरने सहा धावा, सुनील नरेनने आठ धावा आणि रिंकू सिंगने नऊ धावा केल्या.यानंतर मयंक पांडे आणि व्यंकटेश अय्यर यांनी मोर्चाचा सांभाळला. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी ६२ चेंडूत ८३ धावांची भागीदारी झाली. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या पांडेला हार्दिकने बाद केले. तो ४२ धावा करून परतला. कोलकाताला १७ व्या षटकात दोन धक्के बसले. या षटकात आंद्रे रसेलला केवळ सात धावा करता आल्या.
या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. वानखेडे स्टेडियमवर त्याने ५० विकेट पूर्ण केल्या. त्याने रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क आणि व्यंकटेश अय्यर यांना बाद केले. अय्यरने मुंबईविरुद्ध ७० धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि तीन षटकार आले. मुंबईतर्फे नुवान तुषाराने तीन, कर्णधार पंड्याने दोन आणि पियुष चावलाने एक विकेट घेतली. कोलकाता संघ १९.५ षटकात १६९ धावांवर गारद झाला.