ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वात व्यावसायिक समजला जातो. मैदानावर चोख कामगिरी करण्यासाठी तंदुरुस्तीवरही त्यांचा भर असतो. एकीकडे भारतात वजन संतुलित ठेवण्यासाठी मांसाहार करणे टाळले जाते. पण या विश्वचषकात मात्र ऑस्ट्रेलियाचे खेळाडू चिकन-तंदुरीवर ताव मारणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या आहारतज्ज्ञानेच खेळाडूंना मांसाहार करण्यावर भर द्यायला सांगितले आहे.

‘‘सामना खेळण्यापूर्वी खेळाडूंनी उत्तम मांसाहार करायला हवा आणि त्यामध्ये चिकनचे प्रमाण जास्त असायला हवे. त्यामुळे सामन्यापूर्वी त्यांच्या आहारात चिकनच्या पदार्थाचा भरणा असेल. यामध्ये चिकन-तंदुरी, टिक्का, कबाब, चिकन मसाला, बिर्याणी यांचा समावेश करण्यासाठी सांगण्यात आले आहे. यामधील चिकन हे ताजेच असायला हवे. त्याचबरोबर काही मासे व मेंढय़ाच्या मांसाचाही यात समावेश असेल,’’ असे ऑस्ट्रेलियाचे आहारतज्ज्ञ मिचेल कोर्ट यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवले आहे.

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू या विश्वचषकात मांसाहारावर भर देणार असले तरी काही शाकाहारी पदार्थाची मागणी त्यांनी केली आहे. यामध्ये त्यांनी शाकाहारी तवा भाजी, डाळ, रायता, चटणी, नान आणि रोटी यांचाही समावेश असणार आहे.

‘‘भारतीय खाद्यपदार्थाबाबत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे विशेष प्रेम आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना या वेळी लोणी आणि दुधाच्या सायीपासून लांब राहायला सांगितले आहे. पण काही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चिकन-तंदुरी आणि कबाब यांच्यावर अतिरिक्त लोणी आणि चाट मसाला लावून खायला आवडते. त्याचबरोबर कोंबडीचे पाय  ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या सर्वात पसंतीचे आहेत,’’ असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. हे सारे पदार्थ किती वातावरणात बनवायला हवेत, याचीही नियमावली त्यांनी ठरवली आहे.

‘‘सामन्याच्या मध्यंतरामध्ये चिकन टिक्का व नान देण्यात यावे. न्याहारीसाठी खेळाडूंना जाम, मध, कमी कॅलरीचे लोणी आणि ताजी फळे द्यायला हवीत. फळांमध्ये सफरचंद आणि केळी यांचा प्रामुख्यांने समावेश असायला हवा. त्याचबरोबर सोया दूध, चहा व कॉफी हेदेखील असायला हवे,’’ असे कोर्ट यांनी सांगितले आहे.

ऑस्ट्रेलिया संघातील अ‍ॅडम झाम्पा हा पूर्णपणे शाकाहारी आहे. त्याच्यासाठी भात, भाज्यांची आमटी, डाळ, उकडलेल्या भाज्या देण्यात याव्यात, असे कोर्ट यांनी आवर्जून बीसीसीआयला कळवले आहे.