राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेचा मानल्या गेलेल्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या वितरणासाठी शासनास गुरुवारचा मुहूर्त सापडला आहे. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता त्याचे वितरण होणार आहे.
शासनातर्फे २०१२-१३ व २०१३-१४च्या अनुक्रमे ४४ व ४० पुरस्कारार्थीचा गौरव केला जाणार आहे. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे व जिल्हय़ाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते हा समारंभ होणार असून, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री विजय शिवतारे, पुण्याचे महापौर दत्तात्रेय धनकवडे, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, खासदार अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे, आमदार मेधा कुलकर्णी, संग्राम थोपटे हेही या वेळी उपस्थित राहणार आहेत. या समारंभात जीवनगौरव, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कार, साहसी पुरस्कार, एकलव्य पुरस्कार आदी पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.