गेल्यावर्षी हैदराबाद पोलिसांनी १५ वर्षांच्या मुलीची बालविवाहातून सुटका केली होती, या मुलीचे कुटुंबिय तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या नातेवाईकांसोबत तिचं लग्न लावून देत होते. पण, पोलिसांनी तिची सुटका करून तिला नवं आयुष्य दिलं आणि तिने या संधीचं सोनं केलं. ही मुलगी क्रिकेट खेळात पुढे चांगली कामगिरी करेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. पण चांगला खेळ खेळत तिनं अंडर-१९ रग्बी संघात आपली जागा पक्की केली आणि आपण काय करु शकतो हे तिनं दाखवून दिलं.

बी. अनुषाला असं तिचं नाव. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात तिचे कुटुंबिय वयानं मोठ्या असलेल्या एका नातेवाईकाशी तिचे लग्न लावून देणार होते. पण हैदराबाद पोलीस आणि ‘चाइल्ड लाइन’ या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने वेळीच हा बालविवाह थांबविण्यात आला. जर  तिचा विवाह थांबवण्यात आला नसता तर गावातल्या असंख्य मुलींसारखी ती बालविवाहाला बळी पडली असती. तिचीही ओळख अशा हजारो मुलींसारखी पुसली गेली असती. पण, या आघातातून तिनं स्वत:ला सावरलं. क्रिकेट हा तिचा आवडता खेळ आहे तिनं यावर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं. अंडर-१९ रग्बी मध्ये ती तेलंगणाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

पोलीस सध्या तिची काळजी घेत आहे. शिक्षण पूर्ण होईपर्यंत पोलीस अनुषाला सगळी मदत करणार आहे. अनुषाला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळून नाव कमावायचं आहे. त्यामुळे ती प्रयत्न करत आहे. तिची ही इच्छा पूर्ण होवो अशी प्रार्थना तिला वाचवणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि पोलिसांनी केली आहे.