भारताचा उदयोन्मुख मल्ल बजरंगला जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाच्या उंबरठय़ावरून परतावे लागले. ६१ किलो गटात त्याला कांस्यपदकाच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.
बजरंगबरोबरच नरेश कुमार (८६ किलो) व मौसम खत्री (९७ किलो) यांनाही रिकाम्या हाताने परतावे लागले. निराशाजनक कामगिरी करणाऱ्या मल्लांच्या यादीत महिला खेळाडू सरिता कुमारीचेही नाव घालावे लागले. तिला पात्रता फेरीतच हार मानावी लागली.
अर्जुन पुरस्कार विजेता बजरंगला पात्रता फेरीत मंगोलियाच्या बॅटबोल्ड नोमीनने १०-० असे निष्प्रभ केले. मात्र नोमीनने अंतिम फेरीत स्थान मिळविल्यामुळे बजरंगला रिपेज फेरीद्वारे कांस्यपदक मिळविण्याची संधी चालून आली. या फेरीतील पहिल्या लढतीत त्याने रीस वेस्ली हंफ्रीवर ६-० अशी मात केली. पाठोपाठ त्याने जॉर्जियाच्या बेका लोमतेझचा १३-६ असा पराभव केला. त्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीत मात्र त्याला युक्रेनच्या व्ॉसिल शुप्तारने पराभूत केले. खत्रीचा रशियाच्या अब्दुसालेम गादिसोवने १०-० असा धुव्वा उडवला. गादिसोवने अंतिम फेरीत स्थान मिळवल्यामुळे खत्रीला रिपेज फेरीत संधी मिळाली. तेथे जर्मनीच्या स्टीफन केहेरने त्याच्यावर ६-५ असा निसटता विजय मिळविला. नरेशला पहिल्याच फेरीत स्वित्र्झलडच्या माकरे लुकास रिसेनने १०-० असे लीलया पराभूत केले.
महिलांच्या ६० किलो गटात सरिताला हंगेरीच्या बार्का एमीसने पात्रता फेरीत ४-२ असे दोन गुणांनी हरवले.