न्यायालयीन प्रक्रियेत विजय; चॅम्पियन्स लीगमधील प्रवेशाचा मार्ग मोकळा

मँचेस्टर सिटी या इंग्लंडमधील अव्वल फुटबॉल संघाने मैदानाबाहेरील न्यायालयीन लढाईत विजय मिळवला आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सिटीवर घालण्यात आलेली दोन वर्षांची बंदीची शिक्षा मागे घेण्यात आली आहे. या कारणास्तव सिटीचा चॅम्पियन्स लीगमध्ये प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

मँचेस्टर सिटीवरील बंदीची शिक्षा उठवण्यात आली असली तरी त्यांच्यावर एक कोटी युरोचा दंड ठोठावण्यात आला आहे. युरोपियन फुटबॉल महासंघाने (यूएफा) सिटीवर ही दोन वर्षांची बंदीची शिक्षा फेब्रुवारीत ठोठावली होती. त्या विरोधात सिटीने स्वित्झर्लंड येथील क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. क्रीडा लवादाने सिटीच्या बाजूने अखेर निर्णय दिला. सिटीवरील बंदी मागे घेण्याचा निर्णय का घेतला यासंबंधी क्रीडा लवाद पुढील काही दिवसांत तपशीलवार माहिती प्रसिद्ध करणार आहे. पॅरिस सेंट जर्मेन, एसी मिलान आणि गलतसराय यांनीदेखील गेल्या दोन वर्षांत ‘यूएफा’कडून घालण्यात आलेल्या बंदीविरोधात न्यायालयीन प्रक्रियेत विजय मिळवला होता. त्यांच्यात आता सिटीची भर पडली आहे.

या निकालामुळे सिटीचा पुढील हंगामात चॅम्पियन्स लीगच्या गटवार साखळीत खेळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पुढील महिन्यात चँपियन्स लीगच्या हंगामातील उर्वरित लढती खेळण्यात येणार आहेत. बंदी उठल्यामुळे सिटीचा या हंगामात खेळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. जर सिटीवरील बंदी उठली नसती तर चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्यासाठी संघातील खेळाडू अन्य संघांशी करारबद्ध होण्याची शक्यता होती. सिटीचे प्रशिक्षक पेप गार्डिओला यांनी मात्र संघ कोणत्याही स्थितीत सोडणार नसल्याचे याआधीच स्पष्ट केले होते.

‘‘न्यायायलीन प्रक्रियेत विजय मिळाल्याचा आनंद आहे. त्यामुळे आमच्या फुटबॉल क्लबची प्रतिष्ठा नेहमीप्रमाणे उंचावलेलीच राहणार आहे,’’ असे सिटीने म्हटले आहे. मात्र पुन्हा एकदा ‘यूएफा’च्या आर्थिक व्यवहारासंबंधी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शंका उपस्थित झाल्या आहेत. या अधिकाऱ्यांनी याआधी गलतसरायवर २०१६मध्ये बंदी घातली होती. गॅलटसरायला ‘यूएफा’च्या एका हंगामात सहभाग घेण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र त्याविरुद्ध गलतसरायने मागितलेली दाद यशस्वी ठरली होती.

घटनाक्रम

* १५ फेब्रुवारी २०२०मध्ये ‘यूएफा’कडून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोन वर्षांचे निलंबन

* आरोप – सिटीने अनेक नियमांचे उल्लंघन केले असून त्यात क्लब परवाना आणि आर्थिक खेळभावना यांचा समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्यांना सहकार्य केले नसल्याचाही सिटीवर आरोप.

* शेख मन्सूर बिन झायेद अल-नहयान या अबुधाबीतील राजघराण्याकडे सिटी संघाची मालकी.