विदर्भची ७ बाद १४१ अशी अवस्था

सुदीप चटर्जीने केलेले शैलीदार शतक, तर प्रग्यान ओझाचे पाच बळी यामुळेच बंगालला विदर्भविरुद्ध पहिल्या डावात आघाडी मिळविण्याची संधी निर्माण झाली आहे. बंगालने केलेल्या ३३४ धावांना उत्तर देताना विदर्भ संघाची पहिल्या डावात ७ बाद १४१ अशी स्थिती झाली.
बंगालने रविवारी ७ बाद २१७ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. चटर्जीने झुंजार खेळ करीत ११६ धावा झळकाविल्या. त्याने ओझा (१७) याच्या साथीत ५३ धावा व अशोक दिंडा (२४) याच्या साथीत ५४ धावांची भर घातली. त्यामुळेच बंगालला सव्वातीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. चटर्जीने १४ चौकार आणि एका षटकारासह ११६ धावा केल्या. विदर्भकडून अक्षय वाखरेने सर्वाधिक चार बळी घेतले.
फैज फाजल व गणेश सतीश यांची ६२ धावांची भागीदारी होऊनही विदर्भ संघाच्या डावाची घसरगुंडी उडाली. फाजल व सतीश हे खेळत असताना विदर्भ बंगालला दमदार उत्तर देईल अशी अपेक्षा होती, मात्र ही जोडी फुटल्यानंतर त्यांचा डाव घसरला. फाजल याने सहा चौकारांसह ६३ धावा केल्या. सतीशने ३६ धावांमध्ये सहा चौकार ठोकले. पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी त्यांना आणखी १९४ धावांची आवश्यकता असून त्यांच्या तीन विकेट्स बाकी आहेत. बंगालचा फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझा याने पाच विकेट्स घेत प्रभावी कामगिरी केली.
संक्षिप्त धावफलक
बंगाल पहिला डाव ११५.४ षटकांत ३३४ (अभिमन्यू ईश्वरन ५८, सुदीप चटर्जी ११६, अशोक दिंडा २४, अक्षय वाखरे ४/८५, श्रीकांत वाघ ३/५३) विदर्भ पहिला डाव ५२ षटकांत ७ बाद १४१ (फैज फाजल ६३, गणेश सतीश ३६, प्रग्यान ओझा ५/३०)

जाफरचा दहा हजार धावांचा विक्रम
रणजी स्पर्धेत दहा हजार धावा करणारा पहिला फलंदाज होण्याचा मान विदर्भचा सलामीवीर वासिम जाफरने पटकावला. हा टप्पा ओलांडण्यासाठी त्याला रविवारी आठ धावांची आवश्यकता होती. बंगालचा द्रुतगती गोलंदाज वीरप्रतापला चौकार मारून ही कामगिरी केली. हा टप्पा ओलांडल्यानंतर तो लगेच बाद झाला. तो पॅव्हेलियनकडे परत येत असताना त्याच्या सहकाऱ्यांनी उभे राहून त्याचे अभिनंदन केले. जाफरने १९९६-९७ मध्ये मुंबईकडून या स्पर्धेत पदार्पण केले. ३७ वर्षीय जाफरने १२६व्या सामन्यात ही किमया साधली. यापूर्वी मुंबईच्या अमोल मुजुमदारने ९२०२ धावा केल्या होत्या. जाफर याने रणजीत आतापर्यंत १० हजार ०२ धावा, दुलीप सामन्यांमध्ये २५४५ धावा, तर इराणी चषक स्पर्धेत १००८ धावा केल्या आहेत. त्याने प्रथम दर्जाच्या २२९ सामन्यांमध्ये ५१ शतके व ८३ अर्धशतके अशी कामगिरी केली आहे. आपल्या या विक्रमाचे श्रेय आपल्या कुटुंबीयांना देत जाफर म्हणाला की, ‘‘माझ्यासाठी ही अतिशय स्वप्नवत कामगिरी आहे. रणजी ही स्थानिक मोसमातील अतिशय प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते व या स्पर्धेत खेळताना मला खूप आनंद मिळाला आहे. प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी आव्हानात्मक असतो. अशी आव्हाने झेलतानाच चांगली कामगिरी होत असते.’’