अंतिम लढतीत चेन्नईयन एफसीचे आव्हान

इंडियन सुपर लीग

आय-लीग आणि फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धावर प्रत्येकी दोन वेळा नाव कोरणारा बेंगळूरु एफसी क्लब शनिवारी इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पदार्पणातच जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. बेंगळूरु येथील श्री कांतीरावा स्टेडियमवर होणाऱ्या आयएसएलच्या अंतिम लढतीत त्यांच्या मार्गात चेन्नईयन एफसीचे आव्हान आहे.

आय-लीगमधून आयएसएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेणाऱ्या बेंगळूरु एफसीची स्वप्नवत वाटचाल सुरू आहे. त्यांनी साखळी गटातील १८पैकी १३ सामने जिंकले आणि उपांत्य फेरीतही विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. मिकू आणि कर्णधार सुनील छेत्री यांना या यशाचे श्रेय जाते. या आक्रमकपटूंनी एकूण २४ गोल केले आहेत. १४ गोल करणारा मिकू गोलतालिकेत दुसऱ्या, तर छेत्री १० गोलसह पाचव्या स्थानावर आहे.

दुसरीकडे चेन्नईने अंतिम फेरीत प्रवेश करत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी दमदार पुनरागमन करत जेतेपदाच्या शर्यतीत प्रवेश मिळवला. जेजे लाल्पेखलुआ हा त्यांचा हुकमी खेळाडू आहे. त्याच्या नावावर एकूण ९ गोल आहेत. त्याला राफेल ऑगस्टोची योग्य साथ मिळाली आहे.