न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला असला, तरी अष्टपैलू शोहाग गाझी या सामन्याचा नायक ठरला. रविवारी सामन्याच्या अखेरच्या दिवशी गाझीने हॅट्ट्रिकसह सहा बळी मिळवले, बांगलादेशचा हॅट्ट्रिक मिळवणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. याचप्रमाणे हॅट्ट्रिकसह सामन्यात शतक झळकावणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. सामन्याच्या अखेरच्या दिवशी न्यूझीलंडने दुसरा डाव २८७ धावांवर घोषित करत बांगलादेशला २५६ धावांचे आव्हान दिले होते, पण बांगलादेशला ४८.२ षटकांत १७३ धावाच करता आल्या आणि सामना अनिर्णीत राहिला. गाझीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.सामन्याच्या अखेरच्या दिवशी १ बाद ११७ धावांवरून पुढे खेळताना पीटर फुल्टॉन (५९), केन विल्यम्सन (७४) आणि रॉस टेलर (नाबाद ५४) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने २८७ धावा केल्या. गाझीने ८५व्या षटकाच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूंवर न्यूझीलंडच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत हॅट्ट्रिक साजरी केली. दुसऱ्या डावात २५६ धावांचा पाठलाग करताना शकिब-अल-हसनच्या नाबाद ५० धावांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशला ४८.२ षटकांत १७३ धावांपर्यंत मजल मारली.