एका गोलने पिछाडीवर असतानाही जिगरबाज खेळ करीत बार्सिलोना रिअल व्हॅलाडोलिडवर ४-१ अशी मात करीत ला-लीगा करंडक फुटबॉल स्पर्धेत आघाडी स्थान कायम राखले.
या सामन्यातील विजयामुळे बार्सिलोना संघाचे आठव्या सामन्याअखेर आठ गुण झाले आहेत. जेव्ही ग्युएराने रिअल संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली मात्र अ‍ॅलेक्स सँचेझ याने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. झेव्हियरने बार्सिलोना संघास २-१ असे आघाडीवर नेले. सँचेझ याने आणखी एक गोल करीत बार्सिलोनाची ३-१ अशी भक्कम स्थिती केली. त्याने संघाच्या चौथ्या गोलातही वाटा उचलला. त्याने दिलेल्या पासवर नेमार याने गोल केला.
रोनाल्डोचा निर्णायक गोल
ख्रिस्तियानो रोनाल्डो याने ९४व्या मिनिटाला केलेल्या सुरेख गोलाच्या जोरावर रिअल माद्रिद संघाने लेव्हेन्टास ३-२ असे हरविले. शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या या लढतीत बाबा दिएवारा याने लेव्हेन्टा संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली मात्र सर्जिओ रामोस याने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली.
बदली खेळाडू म्हणून आलेल्या नेबील एझेर याने ८६ व्या मिनिटाला पुन्हा लेव्हेन्टास २-१ असे आघाडीवर नेले. हा सामना ते याच फरकाने जिंकणार असे वाटत असताना ९० व्या मिनिटाला रिअल संघाच्या अल्वारो मोराटा याने गोल करीत २-२ अशी बरोबरी साधली. दुखापतीच्या वेळेत सामना बरोबरीत संपणार असे वाटत असतानाच रोनाल्डो याने खणखणीत गोल करीत संघाला विजयश्री मिळवून दिली.
जेव्हा आमचा संघ खेळत असतो तेव्हा पाच मिनिटांचा कालावधीही आमच्यासाठी पुरेसा असतो, असे रिअल संघाचे व्यवस्थापक कालरे अँकलेटी यांनी सांगितले. अन्य लढतीत अ‍ॅटलेटिको माद्रिद संघाने सेल्टा व्हिगो क्लबवर मात करीत स्पर्धेतील आठवा विजय नोंदविला.