निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात ४-४ अशी बरोबरी असताना अतिरिक्त वेळेत गेलेल्या सामन्यात प्रेडो रॉड्रिग्जने कलाटणी देणारा गोल करून बार्सिलोनाला युएफा सुपर चषकाचे जेतेपद पटकावून दिले. जॉर्जियातील बोरिस पैचाडे डायनामो अरेनावर खेळविण्यात आलेल्या अंतिम लढतीत ५१, ४९० प्रेक्षकांच्या उपस्थितीत बार्सिलोनाने ५-४ अशा फरकाने सेव्हिलावर विजय मिलवला. या विजयाबरोबर बार्सिलोनाने तिसऱ्यांदा सुपर चषकावर नाव कोरले.
तिसऱ्या मिनिटाला एव्हर बेनेगाने गोल करून सेव्हिलाला आघाडी मिळवून दिली, परंतु लिओनेल मेस्सीचे दोन गोल आणि नेयमार याच्या जागी क्लबमध्ये स्थान मिळवलेल्या राफिन्हाच्या गोलच्या बळावर बार्सिलोनाने मध्यंतरालाच ३-१ अशी आघाडी घेतली. मेस्सीने ७व्या आणि १४व्या मिनटाला फ्री किकवर गोल केले, तर ४४व्या मिनिटाला लुईस सुआरेजच्या पासवर ६ मीटरच्या अंतरावरून राफिन्हाने गोल करत आघाडी
वाढवली.
मध्यंतरानंतर ५२व्या मिनिटाला सुआरेजने गोल करून ही आघाडी ४-१ अशी भक्कम केली. या आघाडीमुळे बार्सिलोनाचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, सेव्हिलाने लढाऊ वृत्ती दाखवताना सामन्यात रंजकता निर्माण केली. बार्सिलोनाची बचावफळी भेदत त्यांनी सामना ४-४ असा बरोबरीत आणला. ५७व्या मिनिटाला जोस अँटोनिओ रेयेसने व्हीटोलोच्या पासवर गोलसत्र सुरू केले. त्यापाठोपाठ ७२व्या मिनिटाला केव्हीन गॅमेइरोने पेनल्टीवर आणि ८१व्या मिनिटाला येव्हेन कोनोप्लांकाने गोल करून सामना ४-४ असा बरोबरीत आणला. ़
निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात ही बरोबरी कायम राहिल्याने ३० मिनिटांचा अतिरिक्त खेळ खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्क बारट्रा व मेस्सीचे गोल करण्याचे प्रयत्न चुकले, तर १०६व्या मिनिटाला सेव्हिलाच्या मारिआनोचा गोल करण्याचा प्रयत्न गोलरक्षक टेर स्टेगन याने हाणून पाडला. दोन्ही संघांकडून कडवा संघर्ष पाहायला मिळाला. ११५व्या मिनिटाला मात्र रॉड्रिग्जने गोलजाळ्याच्या चार मीटरच्या अंतरावरून सेव्हिलाचा गोलरक्षक बेटोला चकवत अप्रतिम गोल केला आणि बार्सिलोनाला पुन्हा आघाडीवर आणले. त्यानंतर बचावात्मक खेळ करत बार्सिलोनाने ही आघाडी कायम राखली आणि तिसऱ्यांदा सुपर चषक उंचावला.
१९
या जेतेपदाबरोबर बार्सिलोनाने १९वा आंतरराष्ट्रीय चषक आपल्या नावावर केला असून त्यांनी १८ जेतेपदे नावावर असलेल्या इटलीच्या एसी मिलान आणि स्पेनच्या रिअल माद्रिदला पिछाडीवर टाकले आहे. मात्र, या तालिकेत इजिप्तचा अल-अहली क्लब २४ जेतेपदांसह अव्वल स्थानावर आहे.

आम्ही वरचढ आणि सर्वोत्तम आहोत, असा माझा समज होता. ६० मिनिटांच्या खेळात सामन्यावर आमचे वर्चस्व होते. ४-१ अशी आघाडी असल्याने थोडेसे निर्धास्त झालो आणि त्यामुळे त्यांना गोल करण्याची संधी मिळाली. हे आमच्यासाठी घातक ठरले असते. पण, सुदैवाने आमचा विजय झाला.
– लिओनेल मेस्सी, बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू

विजयाच्या समीप होतो, पण आघाडी कायम राखणे अवघड होते. आम्ही ४-१ अशी आघाडी मिळवून विजय पक्का केला होता, त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाकडे हरण्यासाठी काहीच राहिले नव्हते. मात्र, संघाने धोका पत्करण्यासारखा खेळ केला. कदाचित तो अंगलट आला असता. – लुईस एनरिक, बार्सिलोनाचे प्रशिक्षक