सेव्हियाला नमवून ‘कोपा डेल रे’ चषक नावावर; लुईस सुआरेझचे दोन, तर मेसी, इनिएस्टा व कुटिन्हो यांचे प्रत्येकी एक गोल

ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद जवळपास नावावर करण्यात यशस्वी झालेल्या बार्सिलोना क्लबने रविवारी आपल्या खात्यात आणखी एक जेतेपद जमा केले. त्यांनी अंतिम लढतीत सेव्हियाला ५-० असे नमवून सलग चौथ्यांदा कोपा डेल रे चषक उंचावला. लुईस सुआरेझचे दोन गोल आणि त्याला लिओनेल मेसी, आंद्रे इनिएस्टा व फिलिप कुटिन्हो यांनी प्रत्येकी एक गोल करून दिलेली साथ, याच्या जोरावर बार्सिलोनाने हा दमदार विजय मिळवला. कोपा डेल रे स्पर्धेतील बार्सिलोनाचे हे एकूण ३०वे जेतेपद आहे.

सुआरेझ आणि मेसी यांनी पहिल्या सत्रात बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. सुआरेझने १४व्या मिनिटाला गोल करताना बार्सिलोनाचे खाते उघडले, त्यात मेसीने ३१व्या मिनिटाला आणि सुआरेझने पुन्हा ४०व्या मिनिटाला गोल केला. त्यात दुसऱ्या सत्रात कर्णधार इनिएस्टा (५२ मि.) आणि कुटिन्हो (६९ मि.) यांनी भर घालत बार्सिलोनाचा विजय निश्चित केला.

  • कोपा डेल रे स्पर्धेतील सर्वात यशस्वी क्लब म्हणून बार्सिलोना आघाडीवर आहे. त्यांनी सर्वाधिक ३० जेतेपद पटकावली आहेत आणि त्यापाठोपाठ अ‍ॅथलेटिक क्लबने २३ जेतेपद जिंकली आहेत.
  • बार्सिलोनाने प्रथमच एकाच स्पर्धेत सलग चार जेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला आहे. १९३३ नंतर अशी कामगिरी करणारा बार्सिलोना हा कोपा डेल रेमधील पहिलाच क्लब ठरला. याआधी अ‍ॅथलेटिक क्लबने १९३० ते १९३३ या कालावधीत अशी कामगिरी केली.
  • कोपा डेल रे स्पर्धेच्या पाच अंतिम लढतीत गोल करणारा लिओनेल मेसी हा दुसरा खेळाडू आहे. याआधी टेल्मो झारा यांनी १९४२ ते १९५० या कालावधीत आठ गोल केले आहेत.
  • आंद्रे इनिएस्टाने कोपा डेल रे स्पर्धेच्या अंतिम लढतीत पहिल्यांदाच गोल केला. त्याने २०११मध्ये सुपरकोपा स्पर्धेच्या अंतिम लढतीत रेयाल माद्रिदविरुद्ध गोल केला होता.

ही अखेरची स्पर्धा- इनिएस्टा

बार्सिलोनाच्या जेतेपदाच्या आनंदाला एक दु:खाची किनार होती. त्यांचा ३३ वर्षीय कर्णधार आंद्रे इनिएस्टा निवृत्तीच्या विचारात आहे आणि याची जाहीर कबुली त्याने दिली. ‘‘या आठवडय़ात मी भविष्याचा निर्णय घेईन आणि तो लोकांना सांगेन. पण, यापुढे अजून बार्सिलोनासह अशा जेतेपदाचा आनंद लुटणार आहे. माझा निर्णय काय असेल, याची सर्वाना कल्पना असेलच. ही कदाचित माझी अखेरची कोपा डेल रे स्पर्धा असेल,’’ असे मत इनिएस्टाने व्यक्त केले.

आंद्रे इनिएस्टाची जागा भरून काढणे अवघड आहे. त्याच्यासारखा खेळाडू मिळणार नाही.   – इर्नेस्टो व्हॅल्व्हेर्डे, बार्सिलोनाचे प्रशिक्षक