बायर्न म्युनिक आणि चेल्सी या दोन बलाढ्य संघांनी चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. म्युनिकने दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात लाजिओला 2-1 असे हरवत विक्रमी 19व्यांदा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. संघाचा स्टार खेळाडू रॉबर्ट लेवांडोवस्कीने 33व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.

पहिल्या सत्रापर्यंत म्युनिकने ही आघाडी कायम राखली. त्यानंतर, दुसऱ्या सत्रात एरिक मॅक्मि चौपा मोटिंगने 73व्या मिनिटाला गोल करत ही आघाडी वाढवली. या गोलच्या नऊ मिनिटानंतर लाजिओने गोल करत लढत 2-1 अशी केली. लाजिओकडून मार्को पारोलोने 82व्या मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निर्धारित वेळेपर्यंत लाजिओला अधिक गोल करता आले नाहीत.

चेल्सीची एटलिको माद्रिदवर मात

दुसरीकडे, चेल्सीने एटलिको माद्रिदला 2-0ने हरवत अंतिम आठमध्ये स्थान मिळवले. चेल्सीकडून हकीम जियेचने 34व्या मिनिटाला गोल केला. चेल्सीच्या बचावपटूंनी माद्रिदच्या संघाला पहिल्या सत्रापर्यंत बरोबरी करण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या सत्रात चेल्सीने आक्रमणाला सुरुवात केली. चेल्सीकडून एमर्समन पालमिएरीने दुसरा गोल करत संघाची गोलसंख्या 2-0 अशी केली. सामन्याच्या शेवटच्या कालावधीत माद्रिदच्या संघाला गोल करता आला नाही.

अंतिम आठमधील इतर संघ

बायर्न म्युनिक आणि चेल्सीव्यतिरिक्त लिव्हरपूल, मँचेस्टर सिटी, बोरुशिया डॉर्टमंड, रियाल माद्रिद, पॅरिस सेंट जर्मन आणि पोर्तो या संघांनी क्वार्टर फायनलमध्ये जागा निश्चित केली आहे.