पुरुष आणि महिलांचा क्रिकेट संघ सहभागी होणार

वृत्तसंस्था, पीटीआय

२०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे पुरुष आणि महिला असे दोन्ही क्रिकेट संघ सहभागी होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मान्य केले आहे. याचप्रमाणे पुढील वर्षी बर्मिगहॅमला होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही महिलांचा संघ खेळवण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी आग्रही असणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मोहिमेला भारताच्या संमतीमुळे मोठे पाठबळ मिळाले आहे. १९०० मध्ये क्रिकेट या क्रीडा प्रकाराचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होता. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या पुनरागमनासाठी ‘आयसीसी’ने नुकतीच एक समितीसुद्धा नेमली आहे. ऑलिम्पिकपासून दूर राहण्यास राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (नाडा) अखत्यारीत न येण्याची ‘बीसीसीआय’ची भूमिका कारणीभूत असल्याचे म्हटले जात होते.

‘‘स्वायत्त संघटना म्हणून ‘बीसीसीआय’चा दर्जा आहे. ऑलिम्पिक किंवा राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्यासाठी ‘बीसीसीआय’ला राष्ट्रीय क्रीडा संघटना म्हणूनही केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची मान्यता घ्यावी लागेल. सध्या तरी संघटनेने खेळाच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना व्हिसा

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना भारत सरकारकडून व्हिसा दिला जाईल, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी दिली. ‘‘पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा व्हिसाचा प्रश्न सोडवण्यात आला आहे. क्रिकेट चाहत्यांना सामने पाहण्यासाठी भारताचा प्रवास करता येईल का, हे मात्र स्पष्ट झालेले नाही,’’ असे सूत्रांनी सांगितले.