इटालीमधल्या ऑर्टीसेई येथे मास्टर लुका मोरोनीला नमवत आर प्रागनानंदा हा अवघा १२ वर्षांचा भारतीय मुलगा बुद्धीबळातला ग्रँड मास्टर झाला आहे. लहान वयात हा किताब मिळवणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. हा किताब मिळवणारा सगळ्यात लहान खेळाडू हा किताब हुकल्याबद्दल तुला खंत वाटते का असं विचारलं असता, असं अजिबात वाटत नाही असं उत्तर प्रागनानंद किंवा प्रागू यानं दिलं आहे.
मे २०१६ मध्ये प्रागू दहाव्या वर्षी सर्वात तरूण आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला होता. आत्तापर्यंतचा सगळ्यात लहान ग्रँड मास्टर सर्जेई कर्जाकिन असून (१२ वर्षे ३ महिने) त्याचा विक्रम प्रागू मोडेल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र प्रागूनं हा किताब मिळवला तेव्हा आज तो १२ वर्षे १० महिन्यांचा आहे. त्यामुळे तो ग्रँड मास्टर होणारा दुसऱ्या क्रमांकाचा तरूण खेळाडू ठरला आहे.

अवघ्या काही महिन्यांच्या फरकानं त्याला पहिल्या क्रमांकानं हुलकावणी दिली असली तरी प्रागूचं यश कमी होत नाही. जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन ग्रड मास्टर झाला त्यावेळी त्याचं वय होतं १३ वर्षे ४ महिने. तर विश्वनाथ आनंदने हा सन्मान १८व्या वर्षी पटकावला. सगळ्यात तरूण भारतीय ग्रँड मास्टर आत्तापर्यंत परीमार्जन नेगी होता, ज्यानं हा किताब १३ वर्षे ४ महिन्याचा असताना पटकावला होता.
प्रागूवर कुठलंही दडपण येणार नाही व तो अत्यंत मोकळ्या मनानं खेळू शकेल याची आम्ही काळजी घेतल्याचं त्याचे प्रशिक्षक आर. बी. रमेश यांनी सांगितलं. रमेश स्वत: विसाव्या वर्षी ग्रँड मास्टर झाले होते.

प्रागूच्या बुद्धीबळ प्रवासाची तर ही कुठे सुरूवात असून मोठ्या स्पर्धा जिंकण्यावर त्याला तोललं जाईल असं रमेश यांनी सांगितलं. एकेदिवशी वर्ल्ड चँपियन बनणं व आनंद व कार्लसनच्या पंगतीत बसणं हे त्याचं ध्येय असेल असंही रमेश यांनी स्पष्ट केलं आहे.
प्रागूच्या वयाचं असताना आपण केवळ आईबरोबर बुद्धीबळ खेळत होतो असं सांगत विश्वनाथ आनंदने प्रागूच्या यशाचं कौतुक केलं आहे. आपल्यापेक्षा वयानं दुप्पट असलेल्या प्रतिस्पर्ध्यांना प्रागू हरवत असून तो भविष्यात खूप मोठी मजल मारू शकेल अशी भविष्यवाणी आनंदने व्यक्त केली आहे.

एकदा आनंद प्रागूच्या घरी गेला होता, त्यावेळी प्रागूनं त्याच्याशी बुद्धीबळ खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. आनंदनं त्यावेळी तुला ही संधी कमवावी लागेल आपोआप मिळणार नाही असं सांगत स्पर्धात्मक वातावरणाची तयारी करण्याचा कानमंत्र दिला होता अशी आठवण प्रागूचे वडील ए रमेशबाबू यांनी सांगितली.

आता प्रागू अधिकृतरीत्या ग्रँड मास्टर झाला असल्यामुळे आनंदबरोबर खेळण्याची त्याची इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. वेलकम टू चेन्नई, सी यू सून असं म्हणत आनंदनेच त्याला निमंत्रण दिलं आहे. प्रागूमध्ये भारताला दुसरा विश्वनाथ आनंद मिळेल अशी अपेक्षा यानिमित्तानं व्यक्त होत आहे.