उपउपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमची आज पोर्तुगालशी झुंज

युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे चित्र स्पष्ट होताच बेल्जियम-पोर्तुगाल या बलाढ्य संघांतील लढतीची चर्चा रंगते आहे. रविवारी होणाऱ्या या सामन्याला बेल्जियमचा रोमेलू लुकाकू विरुद्ध पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो असे स्वरूप प्राप्त झाले आहे.

रॉबर्टो मार्टिनेझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या बेल्जियम संघाने ‘ब’ गटात तीनही सामने जिंकून अग्रस्थानासह बाद फेरी गाठताना जेतेपदासाठी प्रबळ दावेदारी केली आहे. सर्वाधिक गोल करणारा लुकाकू, परिपक्व मध्यरक्षक केव्हिन डीब्रुएने आणि कर्णधार एडिन हॅझार्ड या त्रिकुटामुळे बेल्जियमचा संघ कागदावर पोर्तुगालच्या तुलनेत सरस आहे. त्याशिवाय गोलरक्षक थिबॉट कुर्टिओससुद्धा संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावत आहे.

दुसरीकडे, पोर्तुगालने आतापर्यंत रोनाल्डोच्या गोलधडाक्यामुळेच इथवर मजल मारली आहे, हे स्पष्ट होते. सर्वाधिक खडतर अशा ‘ड’ गटात पोर्तुगालने तिसरे स्थान मिळवले. जर्मनीविरुद्ध त्यांनी पराभव पत्करला, तर फ्रान्सला किमान बरोबरीत रोखण्यात पोर्तुगालला यश आले. मात्र येथून पुढे प्रत्येक सामना ‘जिंकू किंवा मरू’ अशा स्वरुपाचा असल्याने पोर्तुगालला रोनाल्डोवरच विसंबून राहणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे ब्रुनो फर्नांडिस, बर्नार्डो सिल्व्हा यांनी खेळ उंचावण्याची गरज आहे. ही लढत जिंकणाऱ्या संघाची २ जुलै रोजी उपांत्यपूर्व लढतीत इटली-ऑस्ट्रिया यांच्यापैकी एकाशी गाठ पडणार आहे.

१ बेल्जियम-पोर्तुगाल संघ युरो चषकात प्रथमच आमनेसामने येत असून उभय संघांत आतापर्यंत झालेल्या १८ लढतींपैकी पोर्तुगालने सहा, तर बेल्जियमने पाच सामने जिंकले आहेत. सात सामने बरोबरीत सुटले आहेत.