फुटबॉलच्या सामन्यांमध्ये सेंटर फॉरवर्ड आणि काही महत्त्वाच्या खेळाडूंच्या खेळांवर अनेकांचेच लक्ष असते. त्यासोबतच गोल कीपरही तितकाच महत्त्वाचा असतो. आपल्या संघाच्या खेळाडूंसाठी जीवाचं रान करुन गोलपोस्ट जवळ मेहनत घोणारा गोलकीपर बऱ्याचदा संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलतो. अशा या गोलकीपरच्या अफलातून खेळाची झलक नुकतीच स्पॅनिश सेगुंदा डिविजन मॅचमध्ये Spanish Segunda Division match पाहायला मिळाली.

गिजोन आणि ल्यूगो या दोन्ही संघांमध्ये इस्टादिओ अँक्सो कॅरो Estadio Anxo Carro या स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात ७९ व्या मिनिटाला सामन्यातील सर्वात रोमहर्षक क्षण दिसला. ज्यामध्ये जुआन कार्लोस Juan Carlos या गोलकीपरचा जादुई खेळ पाहायला मिळाला. एका गोलपोस्टच्या जवळून जुआनने मोठ्या कसबीने फुटबॉलचा चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टमध्ये नेऊन पोहोचवला.

वाचा : पुन्हा चरित्रपटांची लाट!

फुटबॉल खेळाच्या इतिहासामध्ये आजवर अनेक खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली आहे. अगदी सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला होणारे गोल किंवा प्रतिस्पर्ध्याच्या पायात अडथळे निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न असोत. फुटबॉल प्रेमींसाठी हे क्षण अतिशय मोलाचे असतात. अशाच क्षणांच्या यादीत जुआनचा हा गोल सध्याच्या घडीला अग्रस्थानी पोहोचला आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण, सोशल मीडियावर अनेकांनीच जुआनच्या खेळाचे आणि त्याच्या फुटबॉल कौशल्याची प्रशंसा केली आहे. मुख्य म्हणजे गोलपोस्टच्या दिशेने जुआनने हटके अंदाजात बॉल मारल्यानंतर त्याच्या टीममधील खेळाडूंनाही काही क्षणांसाठी त्या प्रसंगावर विश्वास बसत नव्हता. पण, कितीही अविश्वसनीय असली तरीही या ‘अजब गोलची गजब कहाणी’ सध्या अनेकांच्या मनात ‘गोल’ करुन राहिलीये असे म्हणायला हरकत नाही.