मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी आयपीएलच्या सहाव्या पर्वामधील सट्टेबाजांची देशव्यापी धरपकड सुरू केली होती तरी सट्टेबाजांनी आपले उद्योग सुरुच ठेवले होते. ते टेनिस आणि फुटबॉलच्या सामन्यावरही सट्टा लावत होते, अशी माहिती दिल्लीतून अटक केलेल्या भरत दिल्ली या सट्टेबाजाच्या तपासातून पुढे आली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी दिल्लीतून नरेश बन्सल उर्फ भरत दिल्ली या सट्टेबाजाला अटक केली होती. दिल्लीमध्ये लोकेश दिल्ली, भरत दिल्ली आणि शाम दिल्ली या त्रिकुटांची सट्टेबाजी चालायची. लोकेश दिल्लीच्या नावाने हे त्रिकुट प्रसिद्ध होते. पाकिस्तानीला सट्टेबाजांशी त्यांचे व्यवहार चालायचे. रमेश व्यास या सट्टेबाजाच्या माध्यमातून ते पाक आणि दुबईच्या सट्टेबाजांच्या संपर्कात होते. मुंबई पोलिसांनी १४ मे रोजी रमेश व्यास याला अटक केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी खेळाडू आणि इतर सटट्ेबाजांना अटक केली. मात्र तरीही हे त्रिकुट बिनधास्तपणे सट्टा लावत होते. आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत सट्टा लावल्याची कबुली अटकेत असलेल्या भरत दिल्ली याने दिली आहे. शाम आणि लोकेश दिल्ली हे दोघे सट्टेबाज फरार झाले आहेत. टिंकू दिल्ली नंतरची हे दुसऱ्या क्रमांकाचे सट्टेबाज होते. भरत दिल्ली याने क्रिकेट व्यतिरिक्त फुटबॉल आणि टेनिस सामन्यावरही सट्टा लावत असल्याची माहिती दिली आहे. भरत फुटबॉल आणि टेनिस वर सट्टा लावायचा असेल तेव्हा टेनिस दिल्ली हे नाव तो वापरत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या नरेश बन्सल उर्फ भरत दिल्लीला २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
आयपीएल चौकशी समितीशी रत्नाकर शेट्टी यांची भेट
नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचा सीईओ गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा यांच्या चौकशीसाठी बीसीसीआयने नेमलेल्या दोन निवृत्त न्यायाधीशांच्या चौकशी समितीशी बीसीसीआयचे अधिकारी प्रा. रत्नाकर शेट्टी यांनी शुक्रवारी भेट घेतली. आयपीएलच्या सहाव्या मोसमातील स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी मयप्पन आणि कुंद्रा पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यामुळे बीसीसीआयने त्यांच्या चौकशीसाठी ही समिती नियुक्त केली होती. ‘‘बीसीसीआयकडून त्यांना कार्यकारी आणि प्रशासकीय स्वरूपाचे पूर्णत: सहकार्य मिळेल,’’ असे बीसीसीआयचे खेळ विकास महाव्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले.