ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा

भारताचा पुरुष एकेरीतील आघाडीचा टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनने शनिवारी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरला. मुख्य फेरीतील स्थान पक्के केलेल्या एका खेळाडूने घेतलेली माघार प्रज्ञेशच्या पथ्यावर पडली.

डावखुऱ्या प्रज्ञेशने आता पहिल्या फेरीचा अडथळा दूर केल्यास दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर सर्बियाच्या गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान उभे ठाकू शकते. प्रज्ञेशने २०१९ पासून सलग पाचही ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

‘‘पराभूत होऊनसुद्धा मुख्य फेरीत प्रवेश मिळाल्यामुळे मी फार आनंदी आहे. मात्र सध्या मी फक्त पहिल्या फेरीवरच लक्ष केंद्रित करत असून जोकोव्हिचविरुद्ध खेळण्याची संधी लाभल्यास मी माझे सर्वस्व पणाला लावेन,’’ असे ३० वर्षीय प्रज्ञेश म्हणाला.

वणव्यामुळे मेलबर्नमध्ये वायुप्रदूषण

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात गेल्या काही आठवडय़ांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वणव्यामुळे संपूर्ण मेलबर्न शहरात वायुप्रदूषण झाले आहे. त्यामुळे अनेक टेनिसपटूंनीसुद्धा आयोजकांवर टीका केली आहे. प्रदूषित हवेमुळे खेळाडू सराव करताना मध्यातच सामने थांबवण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी खेळाडूंची तब्येतसुद्धा बिघडली आहे. ‘‘दूषित हवेमुळे मला श्वास घेताना फार त्रास जाणवत होता. त्यामुळे मुख्य स्पर्धेदरम्यानसुद्धा अशीच स्थिती कायम राहिल्यास मी स्पर्धेतून माघार घेण्यास प्राधान्य देईन. वयाच्या २०व्या वर्षीच मला माझा जीव धोक्यात घालायचा नाही,’’ अशी कणखर टीका स्टीफानोस त्सित्सिपासने केली. मात्र खेळाडूंच्या सुरक्षेची आम्ही पूर्ण काळजी घेणार असून हवामानाने धोक्याची पातळी ओलांडल्यास खेळ स्थगित करण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले.