मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष तसेच भाजपचे नेते आशीष शेलार हे भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या (बीएफआय) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शेलार यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना अध्यक्षपदासाठी अजय सिंह यांचे तगडे आव्हान असणार आहे. सप्टेंबरमध्ये ‘बीएफआय’च्या निवडणुका होणार होत्या, मात्र करोनामुळे ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली. आता गुरुग्राम येथे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ डिसेंबर आहे.

‘‘बॉक्सिंग परिवारात सामील होण्यासाठी मी उत्सुक आहे. ऑलिम्पिकमध्ये उज्ज्वल भवितव्य असलेला हा खेळ पुढच्या स्तरापर्यंत नेण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. त्याचबरोबर क्रिकेट आणि फुटबॉल क्षेत्रातील मान्यवरांशी असलेल्या नातेसंबंधांमुळे मी देशाच्या अव्वल बॉक्सर्सना प्रत्येक महत्त्वाच्या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी देणार आहे,’’ असे शेलार यांनी सांगितले.