अखेर कसोटी, वन डे, टी-२० या पैकी कोणत्याच मालिकेत इंग्लंडला हाती यश आले नाही. वन डे आणि टी-२० मध्ये दबदबा निर्माण करण्यासाठी इंग्लंड अनेक वर्ष प्रयत्नशील आहे. परंतु सातत्याने आंतरराष्ट्रीय रंगमंचावर ठसा उमटवण्यात ते अयशस्वी ठरले आहेत. इंग्लंडच्या सखोल फलंदाजीचे गोडवे त्यांचे माजी खेळाडू गात असले तरी प्रत्यक्ष मैदानावर एकावेळेस कोण तेतरी दोनच फलंदाज क्लिक होताना दिसले. बटलर, स्टोक्स, मोईन अली यांनी अष्टपैलू या बिरुदाला साजेसं फार काही केलं नाही. बंगलोरच्या सामन्यात तर त्यांची फलंदाजी कोर्ट मॅरेज सारखी दोन मिनिटात आटोपली.

दोन लेगस्पिनरचा कोहलीचा डाव हुकमी:
लेग स्पिनर ही क्रिकेट मधली दुधारी तलवार आहे. लेग स्पिनर चालला तर फलंदाजी कापून काढतो आणि नाही चालला तर अती महाग ठरतो. लेग स्पिनर ला घेऊन खेळताना संघातल्या फलंदाजांनी चांगली धावसंख्या करणे गरजेचे असते. धावांचा टेकू असला की लेग स्पिनर ठेवणीतले प्रयोग करू शकतो. दोन लेग स्पिनर घेऊन टी२० सामना खेळणे ही लेग स्पिनच्या कलेला आणि सामर्थयाला दिलेली मोठी दाद आहे. मिश्रा आणि चहाल ने हा विश्वास सार्थ ठरवला हे पाहून आनंद झाला. ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर खेचून टाकलेला फ्लायटेड चेंडू फलंदाजाला जाळ्यात पकड़तो हे लक्षात आल्यामुळे हा चेंडू इथून पुढे सर्रास वापरलेला दिसून येईल. या चेंडूवर स्लॉग स्वीपच्या जाळ्यात अनेक फलंदाज अडकले. ज्यो रुटला पडलेला चहालचा फ्लिपर पाहून कुंबळे खुश झाला असणार. टी-२० सामन्यात सहा बळी म्हणजे फलंदाजांची भंबेरी उडणे. चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंड मध्ये असली तरी दोन लेग स्पिनर चा मोह कोहलीला झाल्यास आश्चर्य वाटू नये.

दबंग युवराज सिंग
दबंग शब्दाचे मैदानावरील रूप म्हणजे युवराज सिंग. पंजाबी माणसाला शक्तीचे वरदान असते आणि ह्या शक्तीचे प्रयोग करायला तो आतुर असतो. युवराज ने गेली सतरा वर्ष अशी लोभस दबंगगिरी नुसत्या फलंदाजितच नाही तर ईतर अनेक बाबतित दाखवली आहे. बंगलोरच्या सामन्यात क्रिस जॉर्डनचे स्लोवर वन ओळखून त्याने लांब लांब मारलेच पण सेलिब्रेशन करताना चहालला लहान बाळासारखे सहज उचलले. गेल्या काही दिवसात अत्यंत गंभीर युवराज पहायला मिळत होता. (हा लग्ना आधी असा नव्हता वगैरे म्हणून संघातील खेळाडू त्याची खेचत असतात) कालचे त्याचे रूप पाहून त्याच्यातला दबंग जागा असल्याचे पाहून आनंद झाला. कोणत्याही क्रीड़ा प्रकारात अशा व्यक्तिमत्वांची गरज असते. त्याने खेळ चमकदार होतो.

धोनीचा करिश्मा शाबूत:
धोनीने पुन्हा एकदा वादळी 56 धावा करुन तो अजूनही जुना धोनी असल्याचे दाखवून दिले.धोनी फलंदाजी करताना प्रेक्षकांनी हेल्मेट घातलेलेच बरे.त्याचा षटकार कुणालाही कायमचा जायबंदी करू शकतो.मैदानावर कोहलीने धोनीचा सतत सल्ला घेणे आणि धोनीने तितक्याच् आत्मीयतेने देणे हे दृश्य आल्हाददायक आहे. ‘धोनी विल बी ऑल वेज माय कॅप्टन’ हे कोहलीचे वाक्य रोमांचित करणारे आहे.

 

– रवि पत्की
sachoten@hotmail.com