बांगलादेश संघाने भारताला सलग दोनदा हारवून तीन सामन्यांची मालिका खिशात घातली. हा विजय बांगलादेशसाठी भीमपराक्रमच आहे. भारताला मालिकेत पराभूत करणे त्यांना कधीच जमले नव्हते. त्यामुळे बांगलादेशात उत्सवाचे वातावरण आहे. साहेबाच्या खेळाने वेड लावलेला तोसुद्धा एक देश आहे. कधी ना कधी तरी त्यांना चांगले निकाल द्यायलाच पाहिजेत. नाहीतर वर्षातून दोन तीन विजय मिळवून किती दिवस आयसीसीला लटकणार?
कालच्या विजयानंतर काही गोष्टी चटकन डोळ्यात भरल्या. एक म्हणजे त्यांच्या गोलंदाजीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. चांगला वेग आणि उत्तम नियंत्रण आणि अचूकतेने गोलंदाजी करणारे खेळाडू तयार झाले आहेत. एक डावखुरा वेगवान गोलंदाज, दोन उजव्या हाताचे चांगले गोलंदाज, एक चांगला डावखुरा फिरकी गोलंदाज आणि एक ठिकठाक ऑफस्पिनर असा चांगला संतुलित अॅटॅक त्यांचा झाला आहे. फलंदाजी बऱ्यापैकी जमून आलेली आहे. यामुळे त्यांची जिंकण्याची टक्केवारी इथून पुढे निदान भारतीय उपखंडात तरी वाढेल, असं दिसतंय. इथून पुढे बांगलादेशाविरुद्ध सामना असल्यास आपण भारतीय प्रेक्षक थोडे नर्व्हस असू हे नक्की. एक चांगला प्रतिस्पर्धी म्हणून बांगलादेश उदयाला आला आहे. भारतीय उपखंडाबाहेर मात्र जिंकण्यासाठी त्यांना अजून वेळ आहे असं वाटतं. कारण वरच्या दर्जाची स्विंग आणि जलद गोलंदाजी पोषक खेळपट्यांवर खेळण्याइतकी त्यांची फलंदाजी अजून पक्व नाही.
बांगलादेशकडून हारल्यामुळे जगबुडी झालेली नसली तरी व्यवस्थापनाला हुडहुडी भरण्याइतपत भारताला धोक्याचे इशारे मिळायला हवेत. बरयाच् फलंदाजाना एकाग्रतेचा इशू आहे. काही फलंदाजांचा अहंकार पटकन दुखावला जातो आणि वेड्यासारखे फटके मारून बाद होतात. उदा. कोहली. त्याचे चित्त लवकर भरकटते. अक्रॉस खेळ, हवेत मार हे तो पटकन करतो. (अनुष्का शर्माला जबाबदार धरून त्याच्या वर्मावर घाव घालू नये) पण त्याने गरम डोक्याने खेळ केला तर त्यालाच तोंडघशी पडावं लागतंय. शमी, वरूण अरोन नसले तर गोलंदाजी बोथट वाटते. धोनीने जडेजा हट्ट सोडला तर बरेच नवीन प्रयोग होऊ शकतात. दोन पराजयाने अगदी संपूर्ण संघ टाकाऊ झाला नसला, तरी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत काही बदल अपेक्षित आहेत. चांगले संघ निरंतर सुधारणा करण्यासाठी धडपडत असतात. म्हणून बांगलादेशाविरूद्धचा पराभव गांभीर्याने घ्यायला हवा.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)