कॅसेमिरोच्या गोलमुळे कोलंबियावर मात

गतविजेत्या ब्राझिलने जेतेपदाच्या दिशेने कूच करताना कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. कॅसेमिरोने भरपाई वेळेत केलेल्या निर्णायक गोलच्या बळावर ब्राझिलने गुरुवारी सकाळी झालेल्या सामन्यात कोलंबियावर २-१ अशी सरशी साधून स्पर्धेतील सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

रिओ दी जानेरो येथील ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या ‘ब’ गटातील या लढतीत लुइस डायसने १०व्या मिनिटाला बायसिकल किकद्वारे अप्रतिम गोल नोंदवून कोलंबियाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत कोलंबियाला ही आघाडी कायम राखण्यात यश आले.

दुसऱ्या सत्रात रॉबर्टो फर्मिनोने ७८व्या मिनिटाला ब्राझिलला बरोबरी साधून दिली. या गोलवरून कोलंबियाचे खेळाडू आणि पंचांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र पंचांनी गोल योग्य असल्याचे जाहीर केले. यादरम्यान वेळ वाया गेल्यामुळे ९० मिनिटांचा खेळ झाल्यानंतर तब्बल १० मिनिटांचा भरपाई वेळ वाढवून देण्यात आला.

९९व्या मिनिटापर्यंत सामना बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच ब्राझिलला कॉर्नर मिळाला आणि नेयमारने लगावलेल्या या कॉर्नरला कॅसेमिरोने हेडरद्वारे गोलजाळ्याची दिशा दाखवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ब्राझिलचे तीन सामन्यांत नऊ गुण झाले असून कोलंबियाने चार सामन्यांत चार गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. त्यांचेही उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. तत्पूर्वी, बुधवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत पेरू संघाने इक्वाडोरला २-२ असे रोखले.

१० ब्राझिलचा हा एकदंर सलग १०वा विजय ठरला. टिटे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझिलचा हा एकूण ४३वा विजय आहे.