कर्णधार नेयमारने अखेरच्या क्षणांमध्ये मिळालेल्या पेनल्टीचा फायदा उठवत केलेल्या एकमेव गोलमुळे मैत्रीपूर्ण लढतीत ब्राझीलने उरुग्वेवर १-० अशी मात केली.

अर्सेनलच्या एमिरेट्स स्टेडियमवर झालेला हा सामना अत्यंत चुरशीचा आणि पारंपरिक दक्षिण अमेरिकन शैलीत झाला. २००१ सालापासून आतापर्यंत या दोन देशांमध्ये झालेल्या १० सामन्यांमध्ये ब्राझीलचा संघ अपराजित राहिला आहे. ब्राझीलचा संघ पुढील वर्षी होणाऱ्या कोपा अमेरिका स्पर्धेसाठी तयारी करीत आहे. यंदाच्या विश्वचषकातील अपयशानंतर ब्राझीलने सलग पाच मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.