बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. सुशांतने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याच्या घरात काम करणाऱ्या एका नोकराने पोलिसांना याबाबत माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. सुशांत सिंग राजपूत हा ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता.

सुशांतने ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केली. धोनीच्या खेळीपासून ते धोनीच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या सवयीपर्यंत सुशांतने धोनीचा खूप चांगल्या पद्धतीने अभिनय केला. त्याच्या या अभिनयाची साऱ्यांनीच वाहवा केली. स्वत: धोनीनेदेखील त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता. मोठ्या पडद्यावर स्वत:लाच बघताना मला खूप मजा आली अशा शब्दात धोनीने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. क्रीडाविश्वातून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.

दरम्यान, सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.