ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीचे मत

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

मुंबई : कर्णधार विराट कोहलीला आगामी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आल्यामुळे रोहित शर्मा व शिखर धवन यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी असणार आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ब्रेट ली याने गुरुवारी व्यक्त केली.

१५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी रोहितकडे संघाची धुरा देण्यात आली असून धवनकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. ली म्हणाला, ‘‘या स्पर्धेत भारताची प्रामुख्याने मदार असणार आहे ती म्हणजे दोन फलंदाजांवर – रोहित शर्मा व शिखर धवन. कर्णधारपद सांभाळताना रोहितची कामगिरी यापूर्वीही चांगलीच झाली आहे. त्यामुळे यंदादेखील तो त्याचे शंभर टक्के  योगदान देईल, यात शंका नाही.’’

‘‘कोहलीला या स्पर्धेसाठी आराम देण्यात आला हे एकप्रकारे त्याच्यासाठी व संघासाठी लाभदायकच आहे. कोहली संपूर्ण वर्षभर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात संघाचा भार एकहाती वाहत असतो. मात्र त्याच्या नसण्याने इतर खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होऊ शकते,’’ असे ली म्हणाला.

‘‘रोहितला डावखुऱ्या गोलंदाजांना खेळणे अवघड जाते, हे मला ठाउक आहे. मात्र येथे परिस्थिती वेगळी असेल. रोहित सर्वावर वर्चस्व गाजवेल, असे मला वाटते. तसेच धवनची साथ त्याला मिळाल्यास भारताचे अर्धे काम फत्ते होईल. धवनने एकदिवसीय प्रकारात नेहमीच सातत्याने धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडमधील अपयशाला विसरून तो येथे नव्याने सुरुवात करेल, अशी अपेक्षा आहे,’’ असेही लीने सांगितले.