डॉ. प्रकाश परांजपे

‘करोनाकोंडी’मुळे आबांच्या ब्रिजचा चक्का जाम झाला होता. त्यांचे नेहमीचे भिडू शेजारचे जाधव दोन महिन्यांपूर्वीच मुलाच्या दोन मैल  दूर असलेल्या जागेत राहायला गेले होते ते तिकडेच अडकले होते. व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड करून करून तरी किती करणार? शेवटी वैतागून त्यांनी हातात एक थाळी आणि डाव  घेतला आणि खिडकीत जाऊन घंटानाद केला. वरच्या मजल्यावरचे भातखंडे आणि मेनन पण असेच उबगले होते. आबा, डाव टाकायचा का?

वरून आवाज आला. ‘या खाली’, आबा म्हणाले. मग टिकटॉकमध्ये डोकं घालून बसलेल्या छोटूला म्हणाले, ‘‘चल रे, बस खेळायला, फोन ठेव जरा बाजूला.’’ छोटू म्हणाला. आबा मला ब्रिज शिकवता का? असं ‘लोकसत्ता’मधले लेख वाचून त्याने एकदा विचारलं होतं. पण आबांनी दुर्लक्षच केलं  होतं. छोटूच्या फोनचा चार्जही  संपत आला होता. तो चक्क खेळायला तयार झाला आणि चौकडीचा कोरम पुरा झाला.

आबांनी छोटूला पानं कशी वाटायची ते शिकवलं आणि कॅट त्याच्या हातात दिला. पानं वाटून होईपर्यंत तिघा बुजुर्गानी आपापल्या फोनवरचे मेसेज तपासले. सवयीप्रमाणे पानं हातात घेऊन मंडळी विचार करू लागली. छोटूनं त्याची पानं आबांकडे सरकवली. सांगा आता काय करायचं ते. आबांनी पाल झटकल्यासारखी ती पानं छोटूकडे परत ढकलली. ‘‘मला दाखवू नकोस. तूच ती हातात घे आणि बोली लाव,’’ आबा म्हणाले. ‘‘पानं बघ आणि काऊंट मोज.’’

‘‘काऊंट म्हणजे?’’ छोटूने विचारलं.  म्हणजे डावाची किंमत. एक्क्याचे चार, राजाचे तीन, राणीचे दोन आणि गुलामाचा एक असे करून एकूण किती आहेत ती बेरीज कर. छोटूने बेरीज केली. ‘‘मोठय़ाने मोजू नकोस. मला सांगू नकोस. फक्त बेरीज कर आणि १२च्या खाली असेल तर पास म्हण,’’ आबांनी आज्ञावली चालू ठेवली. ‘‘जास्त आहेत, आबा,’’ छोटू म्हणाला. ‘‘१२ ते १४ असतील तर एक किलवरची बोली लाव.’’ छोटूचा चेहरा चमकला. ‘‘१ किलवर,’’ तो म्हणाला. भातखंडे पास. आबांकडे पण बरा डाव होता, १३ काऊंट होते. आबांनी  एक बिनहुकमी बोली लावली. के डी जोशींच्या काऊंट पद्धतीने आबा खेळायचे. त्यात पहिल्या फेरीत काऊंट दाखवायचे, मग पंथ. मेनन पास म्हणाला.

‘‘आता पाच पानी पंथ असेल तर बोल.’’

‘‘आबा, माझ्याकडे आहे एक पाच पानी पंथ. बोलू का?’’ छोटूने विचारलं. ‘‘बोल, पण दोनची बोली कर. बिनहुकमी हा सगळ्यात वरिष्ठ पंथ, म्हणून एक बिनहुकमीवर दोनची बोलीच लावली पाहिजे,’’ छोटू दोन चौकट  म्हणाला. भातखंडे पास. आता आबांचे हात खेळण्याकरिता शिवशिवत होते. तीन बिनहुकमी, त्यांनी बोली लावली आणि छोटूला म्हणाले, ‘‘आता पास कर आणि मेननने पहिली उतारी  केल्यावर तुझी पानं खाली पसर (आबांचा ठेका यशस्वी झाला का ते पुढच्या लेखात तपासू या.).

मेननकडे इस्पिकचा पंथ तगडा  होता. त्याने इस्पिक राजाची उतारी केली. छोटूने पानं  पसरली. आबांनी डावाचा आढावा घेतला. बदाम आणि किलवर पंथांची त्यांना काळजी नव्हती. चौकट राजा बाहेर होता. इस्पिक एक्का जिंकून आबांनी चौकट राणी लावली असती आणि जर चौकट राजा बगलेत नसता तर घोळ झाला असता. राजाने दस्त जिंकून भातखंडे इस्पिक खेळला असता आणि पपू जोडीचे इस्पिक पंथातच  चार दस्त झाले असते, म्हणजे ठेका एका दस्ताने बुडाला असता. पण आबा कसबी खेळाडू होते. त्यांनी हातातून छोटं पान खेळून पहिला दस्त मेननला जिंकू दिला. मेननने राणी लावली, आबांनी तोही दस्त त्याला जिंकू दिला. पुढचा दस्त जिंकून आबांनी चौकट राणी पटावर ठेवली आणि छोटूच्या हातातून छोटं पान खेळून भातखंडेकडे विजयी मुद्रेने बघितलं. चौकट राजा जिंकून भातखंडे विचार करू लागला.

त्याच्याकडची इस्पिकची पानं संपली होती. आबांनी शिताफीने इस्पिकची रसद तोडली होती! ठेका यशस्वी झाला होता, वटला होता!

(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com