नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर या वर्षी फॉम्र्युला-वनचा थरार रंगणार नसला तरी वेगाच्या चाहत्यांसाठी मात्र पुन्हा तोच कानठळ्या बसवणारा आवाज आणि वेगाचा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शनिवारी आणि रविवारी बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर होणाऱ्या जेके टायर रेसिंग अजिंक्यपद शर्यतीत देशातील किमान ७५ ड्रायव्हर्स आपले कौशल्य दाखवून तीन वेगवेगळ्या गटांत जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
भारतातील सर्वात जुन्या जेके टायर शर्यतीचा तिसरा टप्पा दोन दिवस नोएडात रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय ड्रायव्हर आणि जेके टायरचा ‘राजदूत’ अरमान इब्राहिम आणि आदित्य पटेल हे अन्य १० जणांसह एफबी-०२ या गटात जेतेपदाच्या शर्यतीत आहेत. या दोन्ही अव्वल ड्रायव्हर्सचा खेळ जवळून पाहण्याची तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याची संधीही युवा ड्रायव्हर्सना मिळणार आहे. मात्र जेतेपदासाठी चेन्नईच्या विष्णू प्रसादचे कडवे आव्हान या दोघांना पेलावे लागणार आहे.
केरळचा बोनी थॉमस व दिल्लीचा करमिंदर पाल सिंग हे फोक्सवागेन पोलो आर चषक स्पर्धेत जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. केरळच्या दिलजित शाजीने गेल्या दोन फेऱ्यांमध्ये सहापैकी चार शर्यती जिंकून सर्वाची मने जिंकल्यामुळे नोएडात त्याच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तसेच या वर्षी जेके टायर सुपर बाइक्स चषकात १००० सीसी क्षमतेच्या मोटारबाइकचा थरार पाहण्याची पर्वणी चाहत्यांना अनुभवता येणार आहे.